Pandharpur By Election Result : भाजपकडून राष्ट्रवादीच्या भालकेंचा ‘करेक्ट कार्यक्रम’, अवताडेंचा झाला ‘एवढया’ मतांनी विजय

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रतिष्ठेची केलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज मतमोजणी झाली. या निवडणुकीत भाजपचे समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगिरथ भालके यांचा पराभव केला आहे. अवताडे यांनी भालके यांचा 3503 मतांनी पराभव केला आहे. अवताडे यांच्या विजयामुळे भाजपने राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला अशी चर्चा सुरु झाली आहे.

या पोटनिवडणुकीला भाजप आणि राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची निवडणूक केली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: या निवडणुकीत लक्ष घातले होते. त्यांनी दोन दिवस पंढरपूरमध्ये तळ ठोकून भगिरथ भालके यांचा प्रचार केला होता. तर भाजपने सहानभूतीच्या लाटेत समाधान अवताडे यांना रिंगणात उतरवले होते. दोन कारखानदार आमने-सामने निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ही निवडणूक चुरशीची झाली. तर दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार केला.

चुरशीच्या झालेल्या या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या पारड्यात 1 लाख 7 हजार 774 मते पडली. तर भगिरथ भालके यांना 1 लाख 4 हजार 271 मते मिळाली. समधान अवताडे 3 हजार 503 मतांनी विजयी झाले. भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सहानभूतीच्या लाटेत भगिरथ भालके हे विजयी होतील अशी चर्चा होती. मात्र, समाधान अवताडे यांनी सहनभूतीच्या लाटेत भालके यांचा दणदणीत पराभव केला. भालके पहिल्या पाच फेऱ्यांपर्यंत आघाडीवर होते. मात्र, त्यानंतरच्या फेऱ्यामध्ये अवताडे यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत काम होती. अवताडे यांनी घेतलेली आघाडी भालके यांना शेवटपर्यंत तोडता आली नाही.

एकूण मतदान –  3 लाख 40 हजार 889

झालेले मतदान –  2 लाख 24 हजार 68 (65.75 टक्के मतदान)

समाधान अवताडे –  1 लाख 7 हजार 774

भगिरथ भालके –  1 लाख 4 हजार 271