‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या चौकशीवरून होणाऱ्या आरोपांना अजित पवारांनी दिलं ‘हे’ उत्तर ! म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या योजनेतील गैरकारभाराबाबत कॅगनं ताषेरे ओढल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय म्हणजे राज्य सरकारनं देवेंद्र फडणवीसांना दिलेला एक मोठा धक्का मानला जात आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सूडबुद्धीनं किंवा मुद्दामून कोण करणार आहे ? अशी विचारणा त्यांनी केली आहे. पुण्यात पवारांच्या हस्ते रुग्णावाहिकेचे लोकापर्ण केल्यानंतर ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “हे जाणूनबुजून करत नाही. कॅगचा अहवाल 2 दिवसांच्या अधिवेशनात सादर करण्यात आला होता. कॅगच्या अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. तशा पद्धतीच्या सूचना गेल्या आहेत.

पुढं बोलताना अजित पवार म्हणाले, “सूडबुद्धीनं किंवा मुद्दामुन कोण करणार आहे ? कॅगचा अहवाल कोणाच्या काळात आला ? कारण नसताना राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. आम्ही विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं तेव्हा जलसंधारण खातं ज्यांच्याकडं होतं त्या तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलं होतं. त्यांनीच तसं सूतोवाच केलं होतं.”

‘अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागाला राज्य सरकारमार्फत सर्वतोपरी मदत करणार’
अजित पवार असंही म्हणाले, “राज्यातील अनेक भागाला अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून संबंधित भागांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. या संकटाच्या काळात राज्य सरकार मार्फत पावसामुळं झालेल्या नुकसान भागात, राज्य सरकारमार्फत सर्वतोपरी मदत करणार.” असंही अजित पवार यांनी सांगितलं.