राष्ट्रवादीच्या ‘या’ दिग्गज नेत्यानं केला दावा, म्हणाले – ‘महाविकासचं सरकार 25 वर्षे चालेल, ‘तो’पर्यंत धोका नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात एकीकडे कोरोनाचा थैमान सुरु असतानाच राजकारण तापतानाही दिसत आहे. भाजपने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना धोबीपछाड देत पंढपूरची पोटनिवडणूक जिंकली आहे. त्यामुळे भाजप राज्यात पुन्हा ऑपरेशन लोटस राबवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान यावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश येत नाही. जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आहेत, तोपर्यंत सरकारला काही होणार नाही. महाविकास आघाडीचे हे सरकार पुढील 25 वर्ष चालेल, असा दावा मुश्रीफांनी केला आहे.

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान अवताडे यांनी विजय मिळवला आहे. दरम्यान या निवडणुकीत प्रचारादरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही पंढरपूरमध्ये भाजपला साथ द्या, मी राज्यात यांचा करेक्ट कार्यक्रम करतो, असे वक्तव्य केले होते. पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा फडणवीसांच्या त्या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यासंदर्भात हसन मुश्रीफांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना हे सर्व दावे फेटाळले आहेत. दरम्यान, पंढरपूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव हा लोकांच्या नाराजीमुळे झालेला नाही. रणनीती आखण्यात आम्ही कमी पडलो. भगीरथ भालके यांच्याऐवजी त्यांच्या आईला उमेदवारी दिली असती, तर काम सोपे झाले असते. मात्र, आम्ही हा निकाल स्वीकारल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.