पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीचे ट्विट; ‘भारतनाना माफ करा…तुमच्या प्रामाणिक सेवेला पैशाने हरविले’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्विट करून म्हटले, की ‘भारतनाना माफ करा. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले’.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे यांचा विजय झाला. तर महाविकास आघाडीच्या भगीरथ भालके यांचा पराभव झाला. या विजयानंतर पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. भालकेंच्या पराभवानंतर मिटकरी यांनी ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘भारतनाना माफ करा. तुम्ही केलेली सेवा भक्त पुंडलिकरुपी असली तरी तुमच्या सेवेपेक्षा मसल आणि मनीपॉवर वापरून भाजपने लढवलेली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती. पैसा व सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले’.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिवंगत भारत भालके यांचे निधन झाले होते. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. राष्ट्रवादीकडून त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली. तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामध्ये आता भगीरथ यांचा पराभव झाला तर आवताडे हे विजयी झाले.