भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसेंना ED ची नोटीस, आता ‘ती’ CD बाहेर येणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना अंमलबजावणी संचनालयाने (ED) नोटीस बजावली असल्याचे वृत्त आहे. या नोटीसनुसार एकनाथ खडसे यांना 30 डिसेंबर रोजी चौकशीसाठी ईडी समोर हजर रहावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ईडीच्या नोटीस संदर्भात एकनाथ खडसे यांनी मौन स्विकारलं आहे.

एकनाथ खडसे यांना 30 डिसेंबरला चौकशीसाठी ED कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आल्याची माहिती शुक्रवारी रात्री उशीरा समोर आली. दरम्यान, एकनाथ खडसे हे आज (शनिवार) दुपारी चार वाजता जळगाव येथे पत्रकार परिषद घेणार असल्याचे समजते. एकनाथ खसडे पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पुण्यातील भोसरी येथील भूखंड गैरव्यवहार प्रकरणात ED नं एकनाथ खडसे यांना नोटीस बजावल्याचे बोललं जात आहे. एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी बुधवारी (दि. 30 डिसेंबर) हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असताना खडसे यांनी यावर भाष्य करणं टाळलं आहे. एकनाथ खडसे यांना ED कडून नोटीस पाठवण्यात आल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

खडसेंनी दिला होता इशारा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाच्यावेळी बोलताना खडसे म्हणाले होते, राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे आपली ED कडून चौकशी केली जाऊ शकते. त्यांनी ईडीची चौकशी लावली तर मी CD लावेन असा इशारा देखील एकनाथ खडसे यांनी भाजपला उद्देशून दिला होता. त्यामुळे आता एकनाथ खडसे खरंच सीडी लावणार का ? आणि सीडी लावलीच तर यामधून कोणाचे पितळ उघडे पाडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.