‘तिथे मॅप बदलले जात आहेत, आणि आपण इथे अ‍ॅप वर बंदी घालतोय’, काय पोरकटपणा आहे !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत – चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण 59 अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तिथे मॅप बदललेत आपण अ‍ॅपवर बंदी घालतोय; काय पोरकटपणा आहे, असे म्हणत त्यांनी सरकावर टीका केली.

चीनी अ‍ॅपच्या माध्यमातून देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटले होते. हे हानीकारक अ‍ॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अ‍ॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत नमूद केले होते.

केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींचा आधार घेत ही कारवाई केली. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ‘69अ’ मधील तरतुदींचा आधार घेत 59 अ‍ॅपवर बंदी आणण्यात आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले.