पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?, जयंत पाटील म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोणीही आरोप केला म्हणून राजीनामा दिला जाईल असे होत नाही. पक्षस्तरावर याची योग्य चर्चा केली जाईल. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जर त्यांना ब्लॅकमेल केल जात असेल आणि त्यांचा दोष नसेल तर राजीनाम्याच्या प्रश्नच उद्भवत नाही. पक्षांच्या अंतर्गत परिस्थितीचा नक्कीच आढावा घेतला जाईल. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करण्यात येईल आणि तत्थ्यांच्या आधारे निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशावर सुरु असलेल्या चर्चांसंबंधी प्रश्न विचारण्यात आला. “माझ्यापर्यंत तर तशी कोणतीही चर्चा आलेली नाही” सांगत पाटील यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळल आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक बाबींवर भूमिका स्पष्ट केली. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर भाजपा आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा खापरे यांनी दिला आहे.