Vaccination : राष्ट्रवादीचा मोदी सरकारला सवाल, म्हणाले – ‘नियोजनाची क्षमता नाही, तर मग जाहिराती करून निर्णय का जाहीर करता?’

पोलीसनामा ऑनलाइन – लसीकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. साडेचार लाख लोकांना दुसरा डोस देता येत नाही. नवीन लोकांना डोस द्यायला लस उपलब्ध नाही. लसीकरण केंद्रावर लोक गर्दी करत आहेत. आधी जाहीर करायच आणि लोकांना लसच उपलब्ध करून द्यायचे नाही. हा मोदी सरकारचा ढिसाळ कारभार आहे. जबाबदारी स्वीकारल्यानंतर जबाबदारी पार पाडण्याची, नियोजनाची क्षमता नसेल तर जाहिराती करून निर्णय कशाला जाहीर करता? असा संतप्त सवाल मलिक यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

मलिक म्हणाले की, मोदी सरकार कोरोनाची स्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे. हे आता स्पष्ट झाले आहे. केंद्राने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावून टास्कफोर्स स्थापन करावे. आपत्ती व्यवस्थापनसाठी एका नेत्याची निवड करावी त्याच्या माध्यमातून कोरोना परिस्थिती हाताळावी, असे केले नाही तर परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याची भिती मलिक यांनी व्यक्त केली आहे.

देशातील 7 उच्च न्यायालयांनी विविध आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालात टास्क फोर्स निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. जी कामे केंद्र सरकार करणे अपेक्षित आहे ती सरकारडून होत नसल्याने न्यायालयाच्या आदेशाने होत आहेत. याचा अर्थ सरकार जबाबदारी पार पाडण्यात कमी पडत असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. भाजपशासित उत्तर प्रदेश अन् बिहारमध्ये कोरोना मॅनेजमेंट जाहिरातीमध्ये आहे. जितके पैसे जाहिरातीवर खर्च करत आहे तेवढे पैसे कोरोनावर खर्च केला असता तर प्रत्येक गावात लोकांचा मृत्यू झाला नसता अशी टीकाही मलिक यांनी केली आहे.