‘चंद्रकांतदादा, ‘तुम्हाला स्वत:च्या गावात ग्रामपंचायतही निवडून आणता आली नाही”; रुपाली चाकणकरांचा टोला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांच्याबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्यावरून निशाणा साधला. ‘स्वत:च्या गावात ग्रामपंचायत निवडून आणता आली नाही. कोल्हापुरात त्यांना महापौर बसवता आला नाही. या दैदिप्यमान कामगिरीमुळेच तुम्हाला कोल्हापूर सोडून पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला’, असा टोला लगावला.

कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांच्या जामिनाच्या मुद्यावरून चंद्रकांत पाटील यांनी विधान केले होते. त्यावरून आता रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून भाष्य केले. त्यामध्ये चाकणकर यांनी म्हटले, की ‘चंद्रकांतदादा पाटील, कोल्हापूर पुर परिस्थितीत आपण केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे आपल्याला आपला मतदारसंघ सोडून आमच्या पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला…सुज्ञास फार न सांगावे लागे!! जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा ते मधील प्रकरणे अशा अनेक घोटाळ्यांची चौकशी बाकी आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांच्या आरोग्याचा विषय हा आमचा मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे आम्ही शांत आहोत. या दुष्टचक्रातून एकदा बाहेर पडलो की सगळी चौकशी होणार आहे.

तसेच साधी आपली ग्रामपंचायत सुद्धा ज्यांना आपल्या ताब्यात ठेवता आली नाही. अशा आमदार महोदयांनी मग्रूरपणा दाखवत इतरांशी बोलू नये. आपल्यातील बरेच नेते जामिनावरच बाहेर आहेत, थोडं मागे वळून पाहिलं तर आपला इतिहास आपल्या लक्षात येईल. चंद्रकांत पाटील यांना कोरोनाच्या संकटाशी काहीही देणघेणं नाही. ‘याला महागात पडेल’, ‘त्याला बघून घेऊ’, ‘त्याच्यावर गुन्हा दाखल करा’, ‘त्याला आत टाका’, अशा विषयांवर पीएचडी पूर्ण करुन चंद्रकांतदादा M.Phil करत आहेत, असेही रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून म्हटले आहे.