झारखंड निवडणूक : हा भाजपच्या अहंकाराचा पराभव, शरद पवारांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – झारखंड विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभवाचा धक्का बसला. झारखंडच्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा व आघाडीची सरशी होत असून भाजपच्या अहंकाराला झारखंडच्या जनतेने उत्तर दिले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. झारखंडच्या जनतेचे त्यांनी अभिनंदन केले आहे.

झारखंडमध्ये सत्ताधारी भाजपचा पराभव करून झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस व मित्रपक्षाचे सरकार स्थापन होण्याची चिन्ह आहेत. या निकालानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया देत भूमिका मांडली. सध्या देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याला लोक एकजुटीने हा प्रयत्न हाणून पाडत आहेत. निवडणुकीत आपण कसेही जिंकून येऊ, असा अहंकार भाजपने दाखवला. मात्र, झारखंडच्या जनतेने भाजपच्या या अहंकाराला योग्य पद्धतीने उत्तर दिले आहे.

शरद पवार पुढे म्हणाले, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंड या राज्यात भाजप सत्तेत होते. निवडणुकीनंतर या राज्यात बदल झाला असून भाजप सत्तेतून पायउतार झाला आहे. देशात होत असलेल्या बदलाच्या प्रवाहात आता झारखंडही सहभागी झाले आहे. त्यामुळे आपण झारखंडच्या जनतेचे आभारी आहोत. इतर राज्याप्रमाणे झारखंडची परिस्थिती वेगळी आहे. याठिकाणी आदिवासी आणि गरिबांची संख्या जास्त आहे. त्याही परिस्थित केंद्र सरकारची वापरली गेलेली सत्तेची ताकद व आर्थिक ताकद न जुमानता झारखंडच्या जनतेने आपला कौल दिला असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/