धनंजय मुंडेंवरील आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  बॉलीवूडमध्ये संधी देण्याच्या बहाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्यावर वारंवार अत्याचार केल्याचा दावा एका तरुणीने केला आहे.पोलीस आपली तक्रार दाखल करून घेत नसल्याचे ट्विटही तिने केले आहे. मात्र त्यानंतर सोमवारी (दि. ११) रात्री ओशिवरा पोलिसांनी तरुणीचा तक्रार अर्ज स्वीकारून अधिक तपास सुरू केला आहे. दरम्यान, मुंडेंवर झालेल्या आरोपामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. तरुणीने केलेल्या आरोपानंतर स्वत: धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियात यावर सविस्तर खुलासा केल्याने उलट-सुलट चर्चा रंगली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित महिलेने केलेल्या आरोपांचा तपास पोलीस करतील तसेच हा त्यांच्या कुटुंबातील विषय आहे. घरातील काय विषय आहे यावर धनंजय मुंडेच बोलू शकतील. पण त्यांच्या बहीण या धनंजय मुंडेंच्या पत्नी आहेत ही खरी गोष्ट आहे,असं मलिक यांनी म्हंटल आहे.

नवाब मलिक म्हणाले की, एखादी तक्रार आल्यानंतर पोलीस निश्चित रूपानं याची चौकशी करणार. ज्या महिला आरोप करत आहेत. त्यांच्या बहिणीशी धनंजय मुंडे यांचं लग्न झालं आहे. त्यांची दोन मुलंही आहेत. त्यांचं नावही मुलांना दिलं आहे. आता त्यांची बहीण पुढे आली आहे. परंतु जे काही आरोप आहेत पोलीस निश्चितचपणे याचा तपास करतील. हा त्यांच्या कुटुंबातील विषय आहे. घरातील काय विषय आहे यावर धनंजय मुंडेच बोलू शकतील. पण त्यांच्या बहीण या धनंजय मुंडेंच्या पत्नी आहेत ही खरी गोष्ट आहे. जे काही सत्य असेल त्यावर पोलीस कारवाई करतील. त्यांच्या बहीण या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत हे तक्रारदार महिला सांगत नाहीत. कौटुंबिक विषय असताना जे काही आरोप होतायत त्यावर पोलीस तपास करतील. चौकशीत जे काही सत्य आहे ते समोर येईल,अशी मलिक यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण ?

तक्रादार तरुणी ही पार्श्वगायिका असून तिने दिलेल्या तक्रारीनुसार, धनंजय मुंडे यांच्याशी तिचा परिचय १९९७ मध्ये इंदूर (मध्य प्रदेश) येथील तिच्या बहिणीच्या घरी झाला. १९९८ मध्ये तिच्या बहिणीशी मुंडे यांचा प्रेमविवाह झाला. २००६ साली बहिण बाळंतपणासाठी इंदूरला गेली असता ती संधी साधून मुंडे यांनी तिच्यावर बलात्कार केला. पुढे दर दोन ते तीन दिवसांनी तिच्यावर अत्याचार सुरू होते. याचे व्हिडीओही त्यांनी काढले. त्यानंतर वारंवार फोन करून प्रेमाची गळ घालण्यास सुरुवात केली. पुढे गायिका होण्यासाठी बड्या सेलिब्रिटी, चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यांसोबत भेट घालून बॉलीवूडमध्ये संधी मिळवून देण्याचे स्वप्न दाखवत अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांंना तिने १० जानेवारी रोजी याबाबत ऑनलाइन तक्रार दिली. मात्र तक्रारीची दखल घेतली गेली नाही म्हणून तिने मुंबई पोलीस आणि आयुक्तांंना ट्विट केले. तिच्या ट्विटमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ ट्विटची दखल घेत, जवळच्या पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यास सांगितले. सोमवारी रात्री ११ वाजता तरुणीचा तक्रार अर्ज पोलिसांनी स्वीकारला. तिचा तक्रार अर्ज स्वीकारल्याच्या वृत्ताला ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी दुजोरा दिला.दरम्यान, तरुणीने जीवाला धोका असल्याचे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनाही हे ट्विट करून मदत मागितली आहे.