राष्ट्रवादीच्या नेत्याचे राज ठाकरेंना पत्र; म्हणाले – ‘मी तुमचा चाहता आहे, तुम्ही मास्क घाला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आजपर्यंत कधीच मास्कचा वापर केला नाही. मंत्रालयात बैठकीतदेखील त्यांनी मास्कचा वापर केला नाही. याशिवाय सार्वजनिक कार्यक्रमातदेखील त्यांनी मास्कचा वापर केला नसल्याचे दिसून आले. दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी नाशिक दौरा केला. यावेळी त्यांनी विना मास्क कार्यक्रमांना उपस्थिती लावली.

नुकताच मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम शिवाजी पार्क येथे पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन मनसेकडून करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी विना मास्क हजेरी लावली. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना तुम्ही मास्क का वापरत नाही असा सवाल केला. त्यावेळी त्यांनी मी मास्क घालत नाही, तुम्हालाही सांगतोय, असे उत्तर दिले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहिले असून, त्यांनी राज ठाकरे यांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.

काय म्हणाले क्लाईड क्रास्टो ?

क्लाईड क्रास्टो म्हणाले, राज ठाकरेंवर टीका न करता एक चाहता आणि प्रशंसकाच्या रूपात काळजीपोटी विनंती करत आहे. भलेही आपल्या राजकीय विचारधारा सारख्या नसतील, पण तुमच्या भाषण कौशल्यामुळे आणि व्यंग चित्रांमुळे मी तुमच्याशी जोडला गेलो आहे, असे क्रास्टो यांनी पत्रात म्हटले आहे.

खरं तर देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. शिवाय देशातील निम्मे रुग्ण महाराष्ट्रात आणि केरळ राज्यात आढळत आहेत. देशाची अशी स्थिती असताना, राज ठाकरे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणं, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने घातक ठरू शकतं. कारण राज ठाकरेंचे लाखो चाहते, कार्यकर्ते त्यांना डोळे झाकून फॉलो करतात. अशा परिस्थितीत राज ठाकरे यांनी मी मास्क घालतच नाही, असं म्हणणं हितावह नाही, असे क्रास्टो यांनी पत्रात म्हटले आहे.