जागा न सोडण्यासाठी राष्ट्रवादीचे दबावतंत्र

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – जागावाटपात नगर लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सोडण्याऐवजी राष्ट्रवादीकडेच ठेवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून दबावतंत्र वापरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभेच्या ज्या मतदारसंघात निवडणूक लढविणार आहे, त्याच मतदार संघात परिवर्तन निर्धार यात्रेच्या माध्यमातून प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या उपस्थितीत सभा घेत आहे. नगर लोकसभा मतदारसंघात ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी चार सभा घेण्यात येणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगरची लोकसभा लढविणार असल्याचे संकेत पक्षाच्या नेत्यांनी दिले आहेत.

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी ४४ जागांचा तिढा सुटला आहे. मात्र चार जागांबाबत अद्याप एकमत झालेले नाही, असे सांगण्यात येत आहे. लोकसभा मतदारसंघाची जागा दोन्ही पक्षाने प्रतिष्ठेची केली आहे. ही जागा सलग तीन लोकसभा निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसने लढविली आहे. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ.सुजय विखे हे इच्छुक आहेत. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी काँग्रेसच्या राज्यपातळीवरील नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस नगरची जागा सोडायला तयार नाही.

नगर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा एकही आमदार नाही. उलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे दोन आमदार आहेत. मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद असल्याने ही जागा आपल्याकडेच रहावी, यासाठी राष्ट्रवादीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नगरच्या जागेत अदलाबदल होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर सुरू केलेली परिवर्तन निर्धार  यात्रा दोन दिवस नगर लोकसभा मतदारसंघात राहणार आहे. या यात्रेदरम्यान पक्षाचे प्रदेश पातळीवरील प्रमुख नेते चार भव्य सभा घेणार आहेत. जागा राष्ट्रवादीकडून लढविणार असल्याने पक्षश्रेष्ठींनी परिवर्तन निर्धार यात्रेच्या नगरमध्ये चार जंगी सभा ठेवल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नगरच्या जागेसाठी आग्रही असल्याचे स्पष्ट होते. अंतिम निर्णय काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

…म्हणून विखेंची बंडखोरीची भाषा?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी नगर लोकसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी सुरू केली याची कुणकुण काँग्रेसची इच्छुक उमेदवार डॉक्टर सुजय विखे लागली असावी. म्हणून त्यांनीच राहुरी तालुक्यातील एका सभेत बोलताना ‘राष्ट्रवादी जागा सोडायला तयार नाही. भाजपची उमेदवारी करणार नाही. आता अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार’, असे विधान करून त्यांनी बंडखोरीची भाषा वापरली होती काय ? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.