काँग्रेस नेत्यासह पुतण्याची गोळ्या झाडून हत्या, संतप्त नातेवाईकांनी हल्लेखोराचे पेटवले घर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्व वैमनस्यातून काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आणि त्यांच्या पुतण्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातील फेमसपूर गावात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यानंतर संतप्त नातेवाईकांनी हल्लेखोरांचे घर पेटवून दिले. पोलिसांनी वेळीच धाव घेत जळत्या घरातून हल्लेखोराच्या कुटुंबातील चार सदस्यांची सुटका केली आहे .

अशोक पटेल (वय 55) आणि शुभम उर्फ बचा पटेल (वय 28 दोघेही रा. फेमसपूर, जिल्हा चित्रकुट) असे गोळीबारात ठार झालेल्या काका पुतण्यांची नावे आहेत. यातील अशोक पटेल हे कॉंग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास फेमसपूर गावात राहणारे कमलेश कुमार हे रायफल घेऊन कॉंग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष असलेल्या अशोक पटेल यांच्या घरी आले. त्यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून पटेल यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळीबाराचा आवाज ऐकताच अशोकचा पुतण्या शुभम उर्फ बचा पटेल आला. तेंव्हा त्याने त्याच्यावरही गोळीबार केला. गोळीबारात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ज्यामुळे संपूर्ण गावात खळबळ माजली. गावकऱ्यांनी मारेकरी पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्यात यशस्वी झाला.

मृतांच्या संतप्त नातेवाईकांनी हल्लेखोराच्या घराला आग लावली. आग लागताच घरातल्या घरातल्यांनी आरडाओरडा करण्यास सुरवात केली. घटनास्थळी पोलीस दल आणि गावकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या काही लोकांनी मारेकऱ्याच्या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी विरोध दर्शविला. जोरदार निषेधादरम्यान वेळीच पोलिसांनी हल्लेखोराच्या कुटुंबातील सदस्यांना सुखरुप बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अंकित मित्तल आणि एएसपी पीसी पांडे हे पोलीस पथकासह गावात दाखल झाले होते. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथक तयार केली आहेत.