मुलांच्या डोळ्यांना वारंवार सूज येत असेल तर असू शकतो किडनीचा ‘हा’ गंभीर आजार ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – नेफ्रोटीक संड्रोम हा एक किडनीचा आजार आहे. लघवीतून जेव्हा अधिक प्रमाणात प्रथिनं जाऊ लागतात आणि शरीरात प्रथिनांची कमतरता भासू लागते तेव्हा त्याला नेफ्रोटीक सिंड्रोम म्हणतात. हा आजार जास्त करून लहान मुलांमध्ये आढळतो. मोठ्यांनाही हा आजार होण्याची शक्यता असते. परंतु 2 ते 6 वर्षांच्या मुलांना हा आजार जास्त होतो.

डॉक्टर सांगतात की, नेफ्रोटीक सिंड्रोममुळं पाय आणि टाचा सुजतात. याशिवाय इतरही समस्या येतात. याचबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

काय आहे नेफ्रोटीक सिंड्रोम ?
किडनी आपल्या शरीरात एखाद्या चाळणी प्रमाणं काम करत शरीरातील दूषित पदार्थ वेगळं करते. परंतु किडनीतील छिद्र जर मोठे झाले तर त्यातून शरीरासाठी आवश्यक पोषक अशी प्रथिनंही बाहेर पडतात. मूत्रामार्गे ही प्रथिनं शरीराबाहेर जातात. यामुळं शरीरात प्रथिनांची कमतरता भासू लागते. परिणामी डोळे आणि पोटात सूज येते. सोबतच कोलेस्ट्रॉलचं प्रमाणंही वाढतं. यात गाळण्याचं काम करणाऱ्या किडनीतील लहान वाहिका खराब होतात. जर वेळीच योग्य उपचार केले नाहीत तर नेफ्रोटीक सिंड्रोम हा आजार दीर्घकाळ राहण्याची शक्यता असते.

काय आहेत नेफ्रोटीक सिंड्रोमची लक्षणं ?
नेफ्रोटीक सिंड्रोम झालेल्या व्यक्तीच्या डोळ्यांच्या चहूबाजूनं आणि पोटात सूज येते. यात उच्च रक्तदाबाची समस्याही होऊ शकते. याशिवाय भूकही कमी लागते. म्हणून अशी काही लक्षणं दिसली तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. यामुळं वेळेत उपचार घेणं शक्य होईल. याचं निदान करण्यासाठी शारीरिक तपासण्या कराव्या लागतात.

1) लघवीची तपासणी – जर या आजाराची लक्षणं दिसत असतील तर लघवीच्या प्रथिनांची तपासणी करावी. यात 24 तास लघवीची तपासणी करायला सांगितलं जातं. यामुळं लघवीतील प्रथिनांचं प्रमाण बरोबर कळून येतं.

2) रक्ताची तपासणी – नेफ्रोटीक सिंड्रोम या आजाराच्या निदानासाठी रक्ताचीही तपासणी केली जाते. यात रक्तातील प्रथिनांची पातळी योग्य आहे किंवा नाही हे तपासून पाहिलं जातं. जर यातील प्रथिनांची पातळी कमी असेल आणि त्यासोबत ट्राईग्लीसेराईडचं प्रमाण पाहिलं तर नेफ्रोटीक सिंड्रोमचं योग्य निदान करणं शक्य होतं.

3) बायोप्सी – या तपासणीत डॉक्टर रुग्णाच्या किडनीच्या पेशीचा छोटा नमुना घेतात आणि जी काही प्रक्रिया करतात त्याला किडनीची बायोप्सी म्हणतात. बायोप्सीमध्ये त्वचेतून किडनीत एक विशेष प्रकारची सुई टाकली जाते आणि तिच्या मदतीनं किडनीच्या पेशी घेतल्या जातात. यानंतर त्यांची तपासणी केली जाते.

नेफ्रोटीक सिंड्रोमपासून कसा कराल बचाव ?
यापासून वाचण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, जर तुम्हाला अशी काही लक्षणं दिसली तर त्वरीत त्यावर उपचार घेऊन ती लक्षणं दूर करावीत. कारण जर हा आजार झाला तर यामुळं भविष्यात इतर समस्या येऊ शकतात. हा आजार जास्त लहान मुलांना का होतो याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मुलांना चरबीयुक्त खाण्यापासून दूर ठेवून रोज त्यांना संतुलित आहार द्यायला हवा. आजकाल लहान मुलं पॅकेज्ड आणि फास्ट फूड जास्त खातात. अशात त्यांना हेल्दी आहार मिळत नाही. म्हणून त्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.