नवीन वाहन कायद्यानंतर आता चक्‍क कपडयाच्या दुकानात हेल्मेटची विक्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने नवीन वाहतूक नियम कायदा कडक केल्यानंतर आता हेल्मेटची विक्री देखील वाढली आहे. हेल्मेटच्या दुकानांवर लोकांची मोठी गर्दी होत आहे. त्यानंतर आता कपड्यांच्या दुकानावर देखील हेल्मेटची विक्री होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर खिसेकापू दंडापासून वाचण्यासाठी लोकं मोठ्या प्रमाणात गाड्यांचे इन्शुरन्स देखील काढून घेत आहेत. त्याचबरोबर हेल्मेटच्या विक्रीत पाच पट वाढ झाली असून मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

महिला तसेच पुरुषांसह लहान मुलांच्या देखील हेल्मेटची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. हेल्मेट विक्रीची अनेक दुकाने उघडली असून कपड्याच्या आणि किराणा मालाच्या दुकानात देखील हेल्मेट विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. हे हेल्मेट आयएसआय मानांकित नसून यांचा सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही फायदा नसून फक्त दंडापासून वाचण्यासाठी यांचा वापर केला जात आहे. दिल्लीतील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर हेल्मेटच्या दुकानांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर नेहमीपेक्षा यावेळी 20 ते 30 टक्के हेल्मेटची विक्री वाढली आहे.

दरम्यान, चांदणी चौकातील अनेक दुकानांमध्ये रंगीबेरंगी हेल्मेट विक्रीसाठी ठेवण्यात आले असून कपड्यांबरोबर देखील मॅच होत आहेत. त्यामुळे नागरिक याची मोठ्या प्रमाणात खरेदी करताना आढळून येत आहेत. त्यामुळे सध्या हा व्यवसाय तेजीत असल्याचे एका स्थानिक दुकानदाराने सांगितले.