नवा लॉकडाऊन म्हणजे सरकारच्या अपयशाची जनतेला शिक्षा : आम आदमी पार्टी

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकार अनलॉक मिशन सुरु झाल्याचे सांगत असताना पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या तोंडचे पाणी पळाले आता मध्यम वर्गीयांनाही घाम फुटला आहे. सरकारच्या अपयशाची शिक्षा जनतेला का ? असा सवाल आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

याआधीच्या शंभर दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात आरोग्य सुविधांचे सक्षमीकरण झाले नाही. आजही पुणे शहरात खाजगी आणि सरकारी इस्पितळात केवळ तीन आयसीयू बेड आणि पाच व्हेंटिलेटर आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत. गेले कित्येक दिवस ही गंभीर स्थिती आहे. पस्तीस लाख लोकसंख्येच्या पुण्यात ही आरोग्यअवस्था आहे. रुग्णांसाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत्यू होत आहेत. कोवीड पेशंट्सना दवाखाना शोधत फिरावे लागते. विलगीकरण कक्षाची स्थिती पाहून रुग्ण पळून जातात अशी अवस्था आहे. कोरोना व्यतिरिक्त अन्य रुग्णांना सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. आरोग्यसेवा पुरविण्यात सरकारला आलेल्या अपयशाचा दोष जनतेच्या माथी मारून सरकार लॉकडाऊन लादत आहे असा आरोप किर्दत यांनी केला आहे.

पुण्यातील या अपयशाला महापालिकेतील भाजप, राज्यातील महाआघाडी सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार जबाबदार आहेत. पुण्यात भाजपचे सहा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन आमदार, भाजपचे खासदार गिरीश बापट, राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सोबतीला दिलेले चार आयएएस अधिकारी असे सगळे मिळून काय करत आहेत? असा जनतेला प्रश्न पडला आहे असे किर्दत यांनी पत्रकात म्हटले आहे.

पुण्यात गेल्या महिन्यात वीस जणांनी आत्महत्या केल्या त्याला आर्थिक संकट कारणीभूत आहे. छोटे व्यापारी आणि असंघटित क्षेत्रातील महिला, खानावळवाले, रोजंदार कामगार, वाहतूकदार, रिक्षा चालक, लघुउद्योजक यांच्यापुढे आर्थिक अरिष्ट उभे आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीच्या सरकारने बांधकाम मजूर, सार्वजनिक वाहतूकदार, ज्येष्ठ नागरिक, विधवा, दिव्यांग यांना महिना पाच हजार रुपयांची रोख मदत दिलेली आहे. दोनशे युनिट वीज माफ केले आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने या पद्धतीचे कुठलेच पॅकेज जनतेला दिले नाही आणि लॉकडाऊनच्या नांवाखाली जनतेला घरी बसायला लावत आहेत हे चुकीचे आहे असे किर्दत म्हणाले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like