दहशतवादी ब्रेंटन टॅरेंट आला होता भारतात, ‘या’ ठिकाणांची केली होती रेकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दोन वर्षांपूर्वी न्यूझीलँडमधील क्राइस्ट चर्च भागातील मशिदीवर अंधाधूंद गोळीबार करून 51 जणांचा बळी घेणारा क्रुरकर्मा दहशतवादी ब्रेंटन टॅरेंट याने भारतात येऊन काही ठिकाणी रेकी करून गेला होता, अशी धक्कादायक माहिती आता उघडकीस आली आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेकडून याबाबतचा एक अहवाल जारी केला आहे. त्यात यासंदर्भातील माहिती दिली आहे. भारतातील मुंबई, जयपूर आणि गोवा आदी ठिकाणी त्याने वास्तव केल्याचे समोर आले आहे.

15 मार्च 2019 मध्ये टॅरेंटने मशिदीवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर न्यूझीलँडच्या संरक्षण संस्थांना मिळालेल्या माहितीनुसार, क्राइस्टचर्च भागातील मशिदीवर हल्ला करण्यापूर्वी या दहशतवाद्याने जगातील अनेक भागांचा दौरा केला होता. यामध्ये भारतातील काही शहरांचा समावेश होता. न्यूझीलँडच्या संरक्षण संस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी तपास सुरू केला. सन 2015-16 या कालावधीत तो दहशतवादी भारतात आला होता. भारतातील मुंबई, जयपूर आणि गोवा या तीन ठिकाणी त्याने वास्तव्य केले होते. सर्वाधिक वास्तव्य त्याने गोव्यात केले होते, अशी माहिती भारतीय गुप्तचर विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली.

न्यूझीलँडमधील तपास यंत्रणांनुसार, चीन, रशिया, जपान, दक्षिण कोरिया आणि भारतासह अनेक देशांमध्ये ब्रेंटन टॅरेंट फिरून आला होता. एवढेच नव्हे, तर संपूर्ण न्यूझीलँड आणि ऑस्ट्रेलियाचा दौराही त्याने केला होता. मार्च 2019 मध्ये मशिदीवर हल्ला करण्यापूर्वी त्याने मुस्लिम समाजाविरोधात अनेक पोस्ट फेसबुकवर शेअर केल्या होत्या, असेही तपासात उघड झाले असल्याचे समजते.