‘कडकनाथ’ कोंबडी पालनामुळे शेतकऱ्यांवर ‘आत्महत्या’ करण्याची वेळ, तरीही प्रदर्शनात कोंबड्यांची विक्री

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईन (अरुण ठाकरे) – पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद ठाणे च्या वतीने जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन सरळगाव येथे संपन्न झाले. दरवर्षी म्हसा यात्रेत हे प्रदर्शन ठरवले जाते, मात्र यावेळी म्हसा यात्रेत हे प्रदर्शन न भरल्याने ते आज सरळगाव येथे संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी कार्यक्रमाला गैरहजेरी लावल्याने या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांकडून नाराजीचा सूर व्यक्त केला जात होता.

सकाळी अकरा वाजता सुरु होणारा हा कार्यक्रम 12.30 वाजता सुरू झाल्याने व व्यासपीठावरील उपस्थित 25 पाहुण्यांचे स्वागत व मार्गदर्शन ऐकण्यातच दुपारचे दोन वाजल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या कार्यक्रमाची सुरुवात हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, दिपाली पाटील, व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य उल्हासनगर बांगर, जिल्हा परिषदेचे उपसभापती अनिल देसले, रेखा कंटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीलाच डॉग शो सादर करून उपस्थित शेतकऱ्यांची मने जिंकून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. तर पशुपक्षी प्रदर्शनामध्ये उपस्थित शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया, या प्रदर्शनामध्ये व्यासपीठावर पाळलेली (पैसे वाल्यांची) कुत्री व्यासपीठावर आणून शेतकऱ्यांचा वेळ घालवल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्यापेक्षा उत्कृष्ट अशा बकऱ्या दूध देणारी गाय कोंबड्या व्यासपीठावर आणून त्यांचा सन्मान केला असता तर शेतकऱ्याला आनंद झाला असता. पैसे वाल्यांचे चोचले पुरवण्यासाठी पाळलेल्या कूत्र्यांना प्रदर्शनामध्ये व्यासपीठावर आणून शेतकऱ्यांचा घोर अपमान केला आहे. कुत्रे दाखवून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे का? अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा होत असल्याचे दिसून आले. वेळ निघून गेल्या कारणाने दूरवरून आलेला शेतकरी भुकेने तहानेने व्याकुळ झाल्याने कार्यक्रम सोडून शेतकरी सारळगाव बाजार पेठेत धाव घेत असल्याचे दिसून आले. या कार्यक्रमात उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. कित्येक शेतकरी या प्रदर्शनामध्ये आधुनिक तंत्राची माहिती मिळावी पशुपक्ष्यांची ओळख व्हावी यासाठी 46 स्टॉल लावण्यात आले होते.

या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे प्रकाश पाटील यांनी आपल्या भाषणात प्रगतशील शेतकऱ्यांचे या व्यासपिठावर सत्कार होत असताना आनंद होत आहे अशा प्रकारची भावना व्यक्त केली. सत्कार हे प्रेरणा घेण्यासाठीच केले जात असल्याने दुसऱ्या शेतकऱ्यालाही या सत्कारामुळे काम करण्याची ऊर्जा मिळत असल्याचे पाटील यांनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला.

माजी आमदार दिगंबर विषय विशे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच कार्यक्रम उशीरा सुरू झाल्याने नाराजी व्यक्त केली. शासनाच्या योजना अनेक आहेत परंतु त्या शेतकर्‍यां पर्यंत पोहोचल्या जात नाहीत याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरवर्षी प्रदर्शन घेतले जाते परंतु जिल्हापशु वैद्यकीय अधिकारी दूध वाढीसाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करत नसल्याची खंत व्यक्त केली.

शेतकऱ्यांना विविध योजनांचा मोठ्या प्रमाणात फायदा व्हावा यासाठी जिल्हा परिषद माध्यमातून व शासनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असतात. शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय बरोबरच दुधाचा जोडधंदा करावा माणसांप्रमाणेच शेतीव्यवसायाला ही तातडीने तज्ञ डॉक्टर उपलब्ध व्हावेत म्हणून एक फिरती व्हॅन उपलब्द करण्याचा मानस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच व्यासपीठावर पाहुण्यांचे स्वागत होत असताना आयोजकांकडून प्रोटोकॉल पाळला जात नसल्याने अखेर जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांना कार्यक्रमातून उठून आयोजकांच्या जवळ जाऊन प्रोटॉकल पाळा अशी सूचना द्यावी लागल्याचे व्यासपीठावर दिसून आले.
या प्रदर्शनामध्ये विविध जातीचे पशु-पक्षी प्रदर्शनाच्या माध्यमातून ठेवण्यात आली होते. खिल्लारी बैल, दूध देणाऱ्या गाई, घोडे, बकऱ्या आधी प्राण्यांचा या स्टॉल वरती समावेश होता. विविध औषधांचे स्टॉल याठिकाणी लावण्यात आले होते.

‌महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या कडकनाथ कोंबडी प्रश्न व त्या पालनामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली असतानाही या प्रदर्शनात एका स्टॉल वर कडकनाथ कोंबड्या विक्री साठी ठेवल्याने या ठिकाणीही तरूणांना खोट्या मोहात अडकविणयाचा बेत आहे का असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित केला. काही पत्रकारांनी उपस्थित पशुवैद्यकीय अधिकारी यांना प्रश्न विचारून हे कडकनाथ कोंबडी या प्रदर्शनामध्ये कशा आल्या असा प्रश्न केल्याने अनेक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना भेटा त्यांच्याकडे माहिती घ्या असे उत्तर देऊन अनेक शेतकऱ्यांना टोलवून लावले.