बीडमध्ये खासगी रुग्णालयांकडून लूट, दीप हॉस्पीटल विरोधात रुग्णाची जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे तक्रार

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीड जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होत असल्याचा प्रकार नेहमीचाच बनला आहे. या समस्येकडे जिल्हा आरोग्य प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचे समोर येत आहे. शहरातील दीप हॉस्पीटलविरोधात अशाच प्रकारची तक्रार असून आता जिल्हा आरोग्य प्रशासन कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता याप्रकरणात आमदार सुरेश धस यांनी लक्ष घातले असून कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

बीड तालुक्यातील गवारी येथील अक्षय गोरख कदम (वय 25) हे रुग्ण विषारी द्रव्य प्राशन करण्यात आल्यामुळे उपचारार्थ शहरातील दीप हॉस्पीटलध्ये (दि.27) जुलै रोजी दाखल झाले होते. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचारादरम्यान अनावश्यक रक्त तपासण्या, महागडी औषधी देऊन 30 हजार रुपये व रुग्णालयातील तपासणी व अ‍ॅडमीशन फीस 30 हजार असे एकूण 70 हजार रुपये बिल आकारले. रुग्णाची प्रकृती ठिक झाल्याचे सांगून (दि.2) रोजी डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी अक्षय कदम यांनी रुग्णालय प्रशासनाची सर्व फीस अदा करुन पावत्या मागितल्या असता अगोदर टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर कदम यांनी घडला प्रकार सामाजिक कार्यकर्ते के.के. वडमारे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन कळविल्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जाब विचारला. त्यानंतर रुग्णालयाकडून बिलाच्या कच्च्या स्वरुपातील पावत्या देण्यात आल्या. यावेळी डॉक्टरांनीच उद्धटपणे उत्तर देताना जीएसटी, कर भरत नसल्याची कबूलीही दिली. त्यानंतर वडमारे यांच्यासमवेत अक्षय कदम यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे तक्रार केली असून चौकशीअंती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वडिलांच्या कर्जापायी मुलाने विष प्राशन केल्याने उपचाराच्या बिलाने वडिलांवर आत्महत्येची वेळ

गवारी येथील अक्षय गोरख कदम (वय 25) यांनी दुष्काळी परिस्थितीमुळे वडिलांचे झालेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतू, सुदैवाने ते उपचारादरम्यान बचावले. आता त्यांच्या उपचारासाठी लागलेला अवाजवी खर्च कसा फेडायचा या विवंचनेतून वडिलांवर आत्महत्येची वेळ आली आहेे.

या प्रकरणाविषयी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले, बीड जिल्ह्यात खासगी रुग्णालयांकडून होत असलेली लूट तात्काळ थांबविण्यात यावी. माझ्याकडे कदम यांची तक्रार प्राप्त झाली असून यासंदर्भात मी आरोग्य प्रशासनाला सूचना करणार आहे. जिल्हा पातळीवर प्रश्न न सोडविल्यास वेळप्रसंगी आरोग्य मंत्र्यांमार्फत चौकशी करण्यात यावी. यापुढे डॉक्टरांनी गोरगरिबांची लूट केल्याचा प्रकार समोर आल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.

रुग्णालयाकडून बिले देण्यास टाळाटाळ, डॉक्टर कर चुकवितात -के.के.वडमारे

सदरील रुग्णालय हे शासनाच्या डोळ्यात धुळफेक करत असून जीएसटी, कर चुकवित असल्याचे प्रथमदर्शनी समोर आहे. याप्रकरणी आयकर, जीएसटी विभागांकडे तक्रार करण्यात आली असून चौकशीचे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले आहे. असे प्रकार बीडमध्ये दरदिवशी हजारो रुग्णांसोबत घडत आहेत. त्यामुळे रुग्णांनी सतर्क राहून रुग्णालयात दाखल झाल्याबरोबर होणार्‍या बिलाची अंदाजित रक्कम जाणून घ्यावी. याशिवाय रुग्णांनी आयसीयु कक्ष, तपासणी फीस, रुम चार्जेस, अ‍ॅडमीशन फीस त्याचबरोबर रक्त तपासण्यांच्या फीसचे रुग्णालय व प्रयोगशाळांच्या बाहेर फलक लावण्यात यावेत. त्यामुळे ग्रामीण भागातील व गरीब रुग्णांना संबंधित खाजगी दवाखान्यात अ‍ॅडमीट व्हावे की नाही? होणार अंदाजित खर्च पेलू शकतो का? याचाही अंदाज येईल. त्यामुळे रुग्णांना उपचारानंतर सावकाराचे दार ठोठावण्याची गरज पडणार नाही. या सर्रास होणार्‍या लुटीकडे जिल्हा आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. येत्या काळात विशेष पथक स्थापन करुन रुग्णालयांची नियमित झाडाझडती, तपासणी न केल्यास आरोग्य विभागाविरोधात आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते के.के.वडमारे यांनी दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –