शहराचा विकास करुन देखील मतांसाठी खाली बघण्याची वेळ : धनंजय मुंडे

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवडचा विकास राष्ट्रवादी काँग्रेसने करून देखील निवडणुकांच्या वेळी मतांसाठी खाली बघण्याची वेळ आली याचं दुर्दैव्य म्हणावं लागेल; अशी खंत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त शेखर ओव्हाळ युवा मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते ‘पिंपरीचा शिलेदार’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. शहराच्या जडण घडणीत योगदान देणाऱ्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पिंपरी विधानसभेतील विविध मान्यवरांचा गौरव धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. या निमित्ताने शहरातील ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांची ग्रंथतुला करण्यात आली. यावेळी धनंजय मुंडे बोलत होते.

पिंपरी विधानसभेतून निवडणुकीसाठी इच्छुक असलेले राष्ट्रवादीचे दावेदार माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते आझम पानसरे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, प्रशांत शितोळे, राजू मिसाळ, शमीम पठाण, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर, प्रज्ञा खानोलकर, प्रसाद शेट्टी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते फजल शेख, मेहबूब शेख, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, माजी उपमहापौर मोहम्मद पानसरे, ज्ञानेश्वर कांबळे, गोपाल देवांग, माजी नगरसेविका मंदाकिनी ठाकरे, सविता साळुंखे, अमिना पानसरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वर्षा जगताप आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.

या वेळी धनंजय मुंडे म्हणाले, पिंपरी-चिंचवडचा सर्वांगिण विकास पवार साहेबांच्या व अजिदादांच्या संकल्पनेतून विकासाची विट या शहरात ठेवल्याने आज जगाच्या पाठीवर हेवा वाटेल असा पिंपरी-चिंचवडचा विकास साकारण्यात आला आहे.

आझमभाई यांच्या ग्रंथतुला विषयी बोलताना मुंडे म्हणाले, “मी विद्यार्थिदशेत असताना सिंबॉयसिस कॉलेजमध्ये शिक्षण घेताना, कॉलेज मधील कॅम्पस मध्ये दररोज आझम पानसरे यांचा विषय असायचा. “मागील महत्त्वाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला नसता तर ते आज पिंपरी चिंचवड, पुण्याचे नव्हे तर महाराष्ट्राचे मोठे नेते झाले असते.

धनुभाऊ मीही तुमच्यासारखा भाषण करेल… शेखर ओव्हाळ प्रास्ताविक मनोगत व्यक्त करताना भाषणासाठी उभे राहिले असता भाषण करत असताना त्यांंचे हृदय भरून आल्याने डोळ्यातून अश्रू येत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यासपीठावर उठून त्यांच्या जवळ जाऊन धीर दिला. यानंतर ओव्हाळ म्हणाले, मी कधीच स्वार्थासाठी राजकारण केले नाही, मला जनतेची सेवा करायची आहे. यामुळे मी उभा आहे, भविष्यात मला संधी मिळाल्यास धनुभाऊ सारखा मी ही जनतेच्या प्रश्नावर विधानसभेत आक्रमकपणे भाषण करेल.