‘त्या’ कार्यालयात २४ शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनचा प्रयत्न

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी पुरवठा होत नसल्याच्या कारणावरून आज २४ शेतकऱ्यांनी पाटबंधारे उप विभागाच्या कार्यालयात सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा प्रकार आज दुपारी एकच्या सुमारास घडला. या प्रकारामुळे पाटबंधारे विभागात एकच खळबळ उडाली आहे. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

शिरपूर तालुक्यातील मांजरोद येथील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला शेतीसाठी पाणी सोडण्यासाठी अनेकवेळा निवदेन दिले होते. मात्र, पाटबंधारे विभागाकडून याकडे कानाडोळा केला जात होता. अखेर मांजरोद येथील २४ शेतकऱ्यांनी आज पाटबंधारे उप विभागाचे कार्यालय गाठून या ठिकाणी पेट्रोल आणि रॉकेल स्वत:च्या अंगावर ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यांनंतर रास्तारोको करण्यात आला. पोलिसांनी हस्तक्षेप करून शिवाजी बुधवंत या आंदोलनकर्त्याची समजूत घातली.

शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावले होते. मात्र चर्चेमध्ये कोणताही समाधानकारक तोडगा निघाला नाही. पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ प्रांतअधिकाऱ्याकडे गेले होते. त्यांनी शेतीला लवकरात लवकर पाणी सोडावे अशी मागणी प्रांतअधिकाऱ्यांकडे केली.

काय आहे नेमका प्रकार
मांजरोद येथील अनेक शेतकरी अनेर मध्यम प्रकल्पाच्या पाटचारी क्रमांक १०च्या मायनर चारी क्रमांक ५ मधून मिळणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र पाटबंधारे विभागाने दोन ठिकाणी माती टाकून पाटचारीत पाणी अडविले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या प्रकरणी २९ मे रोजी पाटबंधारे विभागास निवेदनही दिले होते. यामध्ये शेतक-ऱ्यांनी पाणी द्या अथवा सामूहिक आत्मदहनाची परवानगी मागितली होती. त्यानंतर ५ जून रोजी जिल्हाधिकारी राहुल रेखावर मांजरोद येथे आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला होता. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, तरीही पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना पाणी सोडले नाही. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.