चौकीदाराच्या मुद्द्यावरून खा. गांधी समर्थकांकडून विखे ‘ट्राेल’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर नावाच्या सुरुवातीला चौकीदार, असा उल्लेख केला आहे. खा. दिलीप गांधी यांनीही चौकीदार दिलीप गांधी असा उल्लेख त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन केला आहे. मात्र नुकताच भाजपात प्रवेश करून उमेदवारीचा दावा करणारे डॉ. सुजय विखे पाटील यांनी चौकीदार शब्दाला बगल दिली आहे. त्यामुळे खा. गांधी समर्थकांनी विखे यांना सोशल मीडियावर चांगलेच ‘ट्रोल’ केले आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर चौकीदार नरेंद्र मोदी असा उल्लेख केला आहे. त्यांच्या पाठोपाठ अमित शहा यांच्यासह देशभरातील भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर नावाच्या सुरुवातीला चौकीदार हा शब्द लावला आहे. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खा. दिलीप गांधी यांनीही चौकीदार दिलीप गांधी असा नावाने ट्विटर अकाऊंट केले आहे लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी डॉ. सुजय विखे पाटील हे काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षात आले आहेत. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरील नावात कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही त्यावरून खासदार गांधी समर्थकांनी आयात केलेले व निष्ठावंताचा फरक पहा, असे म्हणून डॉ. सुजय विखे यांना सोशल मीडियावर ट्राेल केले आहे.

जे पक्षाच्या प्रवाहाबरोबर राहत नाही, अशा व्यक्तींना उमेदवारीचा घाट घातल्याचा आरोप गांधी समर्थकांकडून केला जाऊ लागला आहे. खा. गांधी समर्थकांनी सोशल मीडियावर उघडलेली ही मोहीम आता चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे.