माजी खासदार दिलीप गांधी यांना आता आमदारकीचे ‘वेध’ ; ‘या’ मतदार संघातून आमदारकीसाठी इच्छूक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्याने माजी खासदार दिलीप गांधी यांना आता विधानसभेचे वेध लागले आहे. ते नेवासा मतदारसंघातून इच्छुक असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच काल झालेल्या अर्बन बँकेच्या सभागृहातील ग्राहक मेळाव्यात भाजपचे नेवासा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांनी भाजपने गांधी यांना उमेदवारी दिल्यास त्यांना नेवासा मतदारसंघातून निवडून आणू, असे विधान केले आहे. त्यामुळे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

अर्बन बँकेच्या सभागृहात ग्राहक मेळावा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी भाजपचे खासदार गांधी यांना मानणारे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. अर्बन बँकचे उपाध्यक्ष नवनीत सुरपुरीया यांनी प्रास्ताविकात बँकेच्या वतीने आरोग्य जीवनदायी योजनेची माहिती देतानाच प्रारंभी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार गांधी यांचा नेवाशात चांगला जनसंपर्क आहे. भाजपचे ते निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यामुळे येणार्‍या विधानसभेला त्यांनी तालुक्यातून भाजपची उमेदवारी करावी. त्यासाठी आम्ही प्रयत्न करायला मागे पुढे पाहणार नसल्याचे सांगून मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून आणू, असा विश्वास व्यक्त केला.

गांधी यांनी देखील या मागणीला मार्मीक कलाटणी देत नेवाशातून लढा म्हणणे सोपे आहे. परंतु ऐनवेळी पक्ष घेईल तो निर्णय व देईल तो आदेश पाळणार आहे. तुम्ही सगळ्यांनी एवढे प्रेम व्यक्त केले तेच माझ्यासाठी खूप मोठे असल्याचे सांगितले. लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर गांधी यांनी नेवासा मतदारसंघात जनसंपर्क सुरू केला आहे.