आता पॅरोलवर सुटलेल्या गँगस्टरांना मिळणार ‘पेड’ पोलीस बंदोबस्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विविध कारागृहांत शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात गॅँगस्टर पॅरोलच्या रजेवर बाहेर आल्यास प्रतिस्पर्धी टोळी किंवा विरोधकाकडून त्याच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेता त्यांना सशुल्क पोलीस बंदोबस्त पुरविला जाणार आहे. त्यामुळे पॅरोलवर बाहेर आलेल्या गॅंगस्टरांवर पोलिसांची नजरही राहू शकणार आहे.

राज्यातील महत्त्वाच्या कारागृहांत डी गँग, छोटा राजन याच्यासह विविध टोळ्यांतील गँगस्टर, गुंड, अतिरेकी विविध गुन्ह्यांतील कैदी शिक्षा भोगत आहेत. तुरुंग प्रशासनाच्या नियमानुसार त्यांनाही पॅरोल व फर्लोची रजा वरिष्ठांच्या मंजुरीनुसार दिली जाते. गंभीर आजार, कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा अन्य महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी त्यांना ही सवलत दिली जाते. रजेच्या कालावधीत कैदी बाहेर आल्यानंतर, विरोधी टोळी किंवा पूर्ववैमनस्यातून त्याची हत्या, प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता असते.
याबाबत या वर्षी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली होती. त्यावर सुनावणी देताना न्यायालयाने अशा परिस्थितीत पॅरोलवरील संबंधित कैद्याची सविस्तर माहिती घेऊन आवश्यकतेनुसार त्यांना पोलीस बंदोबस्त पुरविण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार, संबंधित कैद्यांना सुरक्षा पुरविताना शुल्क आकारण्याचे धोरण गृहविभागाने नुकतेच निश्चित केले आहे. यासंबंधी गेल्या वर्षी १ एप्रिलला पोलीस सुरक्षा पुरविण्याबाबत निश्चित केलेल्या दराप्रमाणे या कैद्यांकडून बंदोबस्ताचे भाडे घेतले जाणार आहे.
आवश्यकतेनुसार चार श्रेणींत सुरक्षा कैद्यांना पॅरोलची रजा मंजूर झाल्यानंतर त्यांना सुरक्षेसाठी बंदोबस्त पुरविण्याबाबतचा निर्णय न्यायालय अथवा सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून घेतला जाईल. कैद्यांना आवश्यकतेनुसार चार श्रेणींत सुरक्षा पुरविली जाईल. त्याची श्रेणी ए, एम, एक्स व डी अशी करण्यात आली असून, कैद्याच्या जिवाला असलेल्या धोक्याबाबतच्या गंभीरतेनुसार त्यातील एक प्रकारचा बंदोबस्त पुरविला जाईल. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मनुष्यबळाप्रमाणे त्याच्याकडून शुल्क आकारले जाईल. कैद्याला ने-आण करण्यासाठी सरकारी वाहनाचा वापर केला असल्यास त्याचाही रीतसर खर्च त्याच्याकडून वसूल केला जाईल.