हार्दिक पटेल झाले ‘बेरोजगार’ ; मोदींच्या ‘चौकीदार’ ला दिला ‘असा’ टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्या ‘चौकीदार चोर है’ या घोषणेचा धसका घेत ‘मैं भी चौकीदार’ ही मोहिम उघडली आहे. नरेंद्र मोदींच्या या मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी ट्विटरवर आपल्या नावापुढे ‘चौकीदार’ असे लिहिले आहे. अनेक विरोधकांनी या चौकीदाराची खिल्लीही उडविली आहे. मात्र, गुजरातचे पाटीदार समाजाचे नेते आणि नुकतेच काँग्रेसमध्ये सामील झालेले हार्दिक पटेल यांनी ‘चौकीदार’ शब्दाला त्यांच्याच पद्धतीने उत्तर दिले आहे. त्यांनी ट्विटरवर आपल्या नावापुढे ‘बेरोजगार’ असे लिहिले आहे. त्यामुळे ट्विटरवर हार्दिक पटेल यांचे नाव आता ‘बेरोजगार’ हार्दिक पटेल असे झाले आहे.

हार्दिक पटेल यांच्या या मोहिमेची ट्विटरवर जोरदार चर्चा सुरु आहे. राफेल कराराच्या मुद्यावरुन राहुल गांधी आणि काँग्रेस सातत्याने पतंप्रधान नरेंद्र मोदींवर ‘चौकीदार चोर है’ असे म्हणत हल्लाबोल करत आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदींनी शनिवारी सोशल मीडियावर मैं भी चौकीदार ही मोहीम उघडली होती. काही तासातच ‘मैं भी चौकीदार’ हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत होता. तसेच इतर सोशल मीडियावरही या मोहिमेची चर्चा होती. मोदींसह देशातील दिग्गज भाजप नेत्यांनी ट्विटरवर आपल्या नावापुढे ‘चौकीदार’ लिहिले होते. मात्र, चौकीदार शब्दाला बाजूला सारत नावापुढे ‘बेरोजगार’ लिहून हार्दिक पटेल यांनी देशातील मोठ्या समस्येला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

हार्दिक पटेल यांचा उद्देश लक्षात आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक जण हार्दिक पटेल यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. भाजपच्या या चौकीदार मोहिमेची विरोधकांकडून तेवढीच खिल्ली उडविली जात आहे. अंबानी, अदानींचे चौकीदार पासून वेगवेगळ्या पद्धतीने त्यावर टिका केली जात आहे.