‘त्या’ पालकांचं राजसाहेबांना ‘साकडं’ ; काय आहे ‘त्यांची’ कैफियत …

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘राजसाहेब, आम्हाला तुमच्या मदतीची-सहकार्याची गरज आहे, कारण आम्ही असहाय्य झालो आहोत. आता तुम्हीच आमची आशा आहात !’ असं साकडं पालकांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना घातले आहे.

सीबीएसई अभ्यासक्रम शिकवणा-या अंधेरीतील अशोक अकॅडमी या शाळेने दहावीच्या मुलांना इंटर्नल टेस्टमध्ये मिळालेले गुण कमी करून बोर्डाला पाठवल्याची घटना घडली आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या टक्केवारीवर झाला असून त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी आवाज उठवला आहे. या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष घालावे अशी विनंती पालकांनी केली आहे.

रुपेन काटकर यांचा मुलगा दक्ष याला सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत ८८ टक्के गुण मिळाले. पण त्याला इंटर्नल टेस्टमध्ये मिळालेले गुण शाळेने कमी न करता सीबीएसई बोर्डाला अचूकपणे पाठवले असते, तर त्याला ९३ टक्के गुण मिळाले असते, असे पालकांचे म्हणणे आहे. अशोका अकॅडमी या सीबीएसई अभ्यासक्रम शिकवणा-या शाळेने दहावीच्या मुलांना इंटर्नल टेस्टमध्ये मिळालेले गुण मुद्दामहून कमी करून सीबीएसई बोर्डाला पाठवल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

पालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘राजसाहेब, आम्हाला तुमच्या मदतीची-सहकार्याची गरज आहे, कारण आम्ही या प्रकरणात असहाय्य झालो आहोत. आता तुम्हीच आमची आशा आहात !’ असं म्हणत या प्रकरणात लक्ष घालण्याची लेखी विनंती केली आहे. त्यामुळे पालकांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसेचे वर्सोवा विभाग अध्यक्ष संदेश देसाई आणि शाखाध्यक्ष प्रशांत राणे यांनी पुढाकार घेतला आहे.