पोलिसाच्या मुलावर खूनी हल्ला ! ; लोकसभा निवडणुकीतील वादातून हल्ला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार का केला, या रागातून टोळक्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गांधी मैदान परिसरात ही घटना घडली.

पोलिसांनी याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा सुरज सुभाष जाधव (रा. तोफखाना), भैय्या डहाळे (रा. नगर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. दर्शन करांडे व इतर तीन ते चार अज्ञात युवक फरार आहेत. आदित्य संजय गवळी (रा. पोलीस वसाहत, बालिकाश्रम रोड, नगर) हा युवक गंभीर जखमी आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, आदित्य गवळी हा युवक गांधी मैदान परिसरात असताना गुरुवारी अकरा वाजता टोळक्याने तू निवडणुकीत भाजपचा प्रचार केला, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी सुरु केली. काचेची बाटली व लाकडी दांडक्याने डोक्यात बेदम मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या गवळी यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री अकरा वाजता जखमी युवकाचे चुलते समीर ज्ञानोबा गवळी (रा. शिलाविहार, गुलमोहर रोड) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात सूरज जाधव व इतरांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने जाधव व डहाळे या दोघांना अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गवळी हे करीत आहेत.