‘त्या’ इच्छुकाला रोखण्यासाठी ‘पर्वती’मध्ये राष्ट्रवादीची व्यूहरचना !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास केवळ दोन दिवस असताना आगामी विधानसभा निवडणुकीवरून पर्वती विधानसभा मतदारसंघात काँग्रेस – राष्ट्रवादीमध्ये आता वाद उफाळला आहे. कुणाची ताकद जास्त यावरून एकमेकांना खिंडीत गाठताना काँग्रेसमधील एका इच्छुकाची कोंडी करण्याचा डाव रंगत आहे.विशेष म्हणजे या मतदारसंघाबाबत राष्ट्रवादीतील स्थानिक नेतृत्वाने घेतलेल्या भूमिकेला काँग्रेसमधील काही नेत्यांनी सहमती दर्शविल्याचे बोलले जात आहे शिवाय शिवसेना आणि भाजपमधील मंडळींनी छुपा हातभार लावला आहे त्यामुळे काँग्रेसमधील इच्छुक निवडणुकीआधीच अडचणीत सापडले आहेत.

लोकसभा निवडणुकीत कुणी जास्त काम केले,याचा लेखाजोखा आता मांडण्यात येत असला तरी पालिका निवडणूक आणि गत विधानसभा निवडणुकीत मिळालेली मते याचा आधार घेऊन राष्ट्रवादीने या मतदारसंघावर आतापासूनच दावा ठोकला आहे. त्यात पूर्वाश्रमीचा काँग्रेसमधील असलेला ;पण नंतर राष्ट्रवादीतून निवडणूक लढविणारा आणि आता शिवसेनेतून निवडणूक पुन्हा काँग्रेसमध्ये परतलेल्या एका युवा नेत्यामुळे काँग्रेसमधील इच्छुकांचे ‘ गणित ‘ बिघडणार असल्याची चर्चा आहे मात्र त्यामागे मागील निवडणुकीत काँग्रेसमधून कुणी घात केला होता ,याचा वचपा काढण्यासाठी ‘त्या ‘ युवा नेत्याने दंड थोपटले आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणात काहीजणांकडून त्यासाठी ‘ खतपाणी’ही घातले जात आहे. विशेष म्हणजे काँग्रेसमधील एका दिग्गज स्थानिक नेत्याला , ज्यांचा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशीही चांगले संबंध आहेत.

त्या नेत्याच्या विधानसभा निवडणुक लढविण्याच्या मनसुब्यावर पाणी फिरविण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील विरोधक एकवटले आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाचा पुरेपूर वापर करून कोणत्याही स्थितीत ‘त्या ‘इच्छुकाला लगाम घालण्यासाठी राष्ट्रवादीने व्यूहरचना आखली आहे. इतकेच काय मतदारसंघात कार्यकर्त्यांचे जाळे विणताना प्रत्येक प्रभागातील काँग्रेसमधील नाराज कार्यकर्त्यांना ‘आपलेसे’ करून काँग्रेसच्या ‘त्या ‘ नेत्याविरोधात वातावरण निर्मितीही सुरु केली आहे.सन २०१४ ची विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष स्वबळावर लढले. त्याचप्रमाणे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातही युती न झाल्यामुळे भाजप-शिवेसना हे पक्षही स्वतंत्ररीत्या लढले. त्यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्येच या मतदार संघात लढत झाली.

भाजपच्या माधुरी मिसाळ पर्वती मतदारसंघामधून विजयी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेसचा उमेदवार चौथ्या स्थानावर राहिला.सन २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार १५ हजारांच्या फरकाने पराभूत झाला होता.या मतदारसंघातील पालिकेतील पक्षीय बलाबल पाहता २६ नगरसेवकांपैकी २२ नगसेवक भाजपचे असून काँग्रेसचा आणि शिवसेनेचा एक, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक या मतदार संघात आहेत. या पार्श्वभूमीवर आता हा कलगीतुरा सुरु झाला आहे. कसबा विधानसभा मतदार संघ काँग्रेसला देण्यासाठी पर्वती विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आला होता.

मात्र काँग्रेसचे या मतदारसंघावर वर्चस्व राहिले आहे हा काँग्रेसकडून केला जात असलेला दावा खोडून काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेसमधील नाराज गटाला हाताशी धरून मतदारसंघात असलेली काँग्रेसची ताकद पूर्णपणे संपुष्टात आणण्यावर भर दिला आहे. त्यामागे हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याकडे राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांचा असलेला कल पाहूनच ही खेळी सुरु आहे मात्र काँग्रेसमधील ‘त्या ‘ नेत्याला पक्षाकडून अनुकूलता लाभू नये याची पुरेपूर काळजी घेण्यासाठी पूर्वाश्रमीचे नाराज कार्यकर्ते , गट यांना एकत्र आणण्याची किमया राष्ट्रवादीतील स्थानिकांनी साधली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.