राष्ट्रवादीला केडगावमध्ये ‘घर घर’, अंतर्गत वादाचा खा.सुळेंनाही ‘फटका’

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – थोरात गटातील अंतर्गत कलहामुळे दौंड तालुक्यातील केडगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला घर घर लागल्याचे दिसत असून स्थानिक पुढाऱ्यांच्या मनमाणीचा फटका यावेळी खा.सुप्रिया सुळेंनाही बसला आहे. याबाबत खुद्द राष्ट्रवादीच्याच काही नाराज कार्यकर्त्यांकडून याचे विश्लेषण करण्यात येत आहे. त्यामुळे गावपातळीवर राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांना आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली असून लोकांच्या नाराजीमुळे लवकरच संघटनात्मक बदल केले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायानेच थोरात गटाला येथे मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दौंड तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नावलौकिक असणारे केडगाव हे जेष्ठ नेते रमेश थोरात यांचा गड मानला जात होता परंतु नुकत्याच झालेल्या काही निवडणुकांमध्ये केडगावला अंतर्गत गटबाजीचे ग्रहण लागले आणि त्यावर कोटी म्हणून की काय ग्रामपंचायत निवडणुकीला पक्षांतर्गत गटबाजी होऊन पक्षातील मुख्य उमेदवारालाच पाडण्याचे काम पक्षाच्या गावपातळीवरील पुढाऱ्यांकडून करण्यात आले असा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला असून त्याचे मतदानरुपी विश्लेषणही करण्यात आले आहे.

सरपंच पदाच्या उमेदवाराला पाडल्याचा बदला म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीला केडगाव गावठाणामध्ये १२८ मतांची आघाडी घेतलेली राष्ट्रवादी लोकसभेला मात्र ३७५ मतांच्या फरकाने मागे राहिल्याचे पहायला मिळाले आहे. याबाबत नाराज कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणुकीचा दाखला देताना सरपंचपदासाठी उभ्या राहिलेल्या उमेदवाराला ज्या ठिकाणी थोरातांना मानणारा मोठा गट आहे आणि जेथे प्रत्येक निवडणुकीला राष्ट्रवादीला मोठे मताधिक्य असते अश्या ठिकाणी या सरपंच पदाच्या उमेदवाराला डावलून त्याच्या विरुद्ध गटातील उमेदवाराला मदत करण्यात आली आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला हार पत्करावी लागली असे सांगत गावातील स्वतःला थोरात गटाचा मुख्य नेता समजणाऱ्या काहींनी अंतर्गत गेम खेळत सरपंच पदाचा उमेदवार पाडला त्यामुळे आता केडगावमधून राष्ट्रवादीच्या विरोधात या सर्व कार्यकर्त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे आणि त्याची सुरुवात हि लोकसभेच्या निवडणुकीने झाली आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला याची मोठी किंमत राष्ट्रवादीला मोजावी लागण्याची दाट शक्यता आहे.

केडगावमधील कार्यकर्त्यांची नाराजी वरिष्ठ पातळीवर कश्या प्रकारे दूर केली जाते आणि धनाढ्य पुढाऱ्याला होणाऱ्या विरोधाची पक्षपातळीवर आता कश्या प्रकारे दखल घेतली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

जुळी मुलं होण्यासाठी अनेक दांपत्य उत्सुक

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

पालकभाजी आरोग्यासाठी फायदेशीर