राष्ट्रवादीला धक्का ! करमाळयातील रश्मी बागल, दिग्विजय बागल यांच्या शिवसेना प्रवेशाची तारीख निश्चित

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला गळती लागली. राज्यातील अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपा-शिवसेनेत प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठीत मोहिते पाटील घराण्यानेही राष्ट्रवादीची साथ सोडली. अशातच आगामी विधानसाभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सोलापूर जिल्ह्यातील आणखी एक निष्ठावंत कुटुंब राष्ट्रवादीची साथ सोडणार आहे.

करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल आणि त्यांचे बंधू दिग्विजय बागल हे उद्या (मंगळवार) शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधणार आहेत. बागल बहीण-भावाने राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याने राष्ट्रवदीला मोठा धक्का बसला आहे. उद्या दुपारी बारा वाजता मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादीचे पक्षनेतृत्व कामाची कदर करत नसल्याने पक्ष सोडणार असल्याचे रश्मी बागल यांनी यापूर्वी सांगितले होते. रश्मी बागल यांची पक्षाला सोडचिठ्ठी हा सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठा धक्का आहे. करमाळ्यातील बागल गटाच्या मेळाव्यात रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांनी पक्षांतराची घोषणा केली.

कोण आहेत रश्मी बागल ?

करमाळ्याचे स्वर्गीय आमदार दिगंबर बागल यांच्या त्या कन्या आहेत. दिगंबर बागल यांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी पत्नी शामल बागल यांना राष्ट्रवादीने २००९ मध्ये उमेदवारी दिली. दिगंबर बागल हे शरद पवारांचे निष्ठावंत समजले जात. त्यामुळेच त्यांना मंत्रीमंडळातही घेण्यात आले होते. २००९ साली माढा तालुक्यातील ३६ गावे करमाळा विधानसभेला जोडण्यात आली. राष्ट्रवादीने रश्मी बागल यांना २००० साली उमेदवारी दिली मात्र त्यांचा केवळ २५३ मतांनी पराभव झाला. सध्या त्यांच्याकडे मकाई आणि आदिनाथ साखर कारखाने आणि करमाळा कृषी उत्पन्न बाजार समीती आहे. दिगंबर बागल यांचे वारस म्हणून रश्मी बागल यांच्याकडे पाहिले जाते. रश्मी बागल या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपैकी मानल्या जातात.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10157354671205011&id=564565010

आरोग्यविषयक वृत्त-