मंत्री पदाची अपेक्षा बाळगणारे आढळराव घरातच ‘पराजित’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर लोकसभा मतदार संख्याच्या निवडणुकीत सलग चौथ्यादा निवडणून येऊन इतिहास निर्माण करण्याची नामी संधी शिवसेनेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना होती. याशिवाय आढळराव पाटील निवडून आले असते तर केंद्रीय मंत्री मंडळामध्ये मंत्री पदाची संधी आढळराव पाटील यांना मिळाली असती. परंतु कोल्हे यांनी केलेल्या पराभवाने आढळराव पाटील यांची मंत्री पदाची संधी हुकली आहे.

राज्यासह देशभर पुन्हा एकदा मोदी लाट आली असताना व शिवसेनेतील सर्वात ज्येष्ठ खासदार म्हणून यंदा आढळराव पाटील यांना नक्कीच संधी मिळण्याची शक्यता होती. मात्र, ज्याप्रमाणे मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन देशभरात झाले. तसेच तुम्ही केंद्रीय मंत्र्यांना निवडून देणार आहात, असा प्रचार शिवसेनेकडून झाला नाही. शिवसेनेची निर्णय घेण्याची पद्धत लक्षात घेऊन आढळराव पाटील यांनीही तसा प्रचार केला नाही. तसेच गेल्या १५ वर्षापासून ते खासदार असल्याने त्यांच्याविरोधात मतदारांमध्ये नाराजी होती. त्याचा फटका आढळराव पाटील यांना बसला.

राष्ट्रवादी कॉग्रेसने डॉ. कोल्हे यांना उमेदवारी जाहीर करून अर्धी निवडणूक जिंकल्याची चर्चा होती. त्या कोल्हे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी केलेले सहकार्य, प्रचारात त्यांनी सुरुवातीपासून घेतलेली आघाडी, अभिनेता असल्याने महिला व तरुणाईमध्ये आर्कषण, शिस्तबध्द प्रचारयंत्रणा, नवीन तरुण चेहरा, सुशिक्षित उमेदवार या गोष्टी कोल्हे यांचे पथ्थयावर पडल्या. आढळराव सलग तीन टर्म खासदार असून , गेल्या पाच वर्षात मतदार संघाकडे झालेले दुर्लक्ष, खेड तालुक्यांतील विमानतळाचा प्रश्न, बैलगाडा शर्यती सुरू करण्यात आलेले अपयश, पुणे-नाशिक रेल्वे चा विषय केवळ निवडणुकीसाठी केलेला वापर , पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतुक कोंडी, सलग तीन टर्म खासदार राहून अपेक्षित विकास न झाल्याने मतदारांमध्ये असलेली आढळराव यांच्या विरोधातली नाराजी जुन्नर ,खेड, आंबेगाव आणि शिरूर विधानसभा मतदार संघातून स्पष्ट पणे दिसून आली.

कोल्हे यांना जुन्नर तालुक्यात सर्वांधिक ४१ हजार ५५१ मतांची आघाडी मिळाली. आढळराव पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यात देखील कोल्हे यांना २५ हजार ६९७ मतांची आघाडी मिळाली. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या खेड तालुक्यात देखील अमोल कोल्हे यांनी ७ हजार ४४६ मतांची आणि शिरुर तालुक्यातून २६ हजार ३०५ मतांची निर्णायक आघाडी घेतली. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या भोसरी विधान सभा मतदार संघाने आढळराव यांना चांगली साथ दिली. येथे आढळराव पाटील यांना तब्बल ३७ हजार ०७७ मतांनी आघाडी मिळाली. परंतु भोसरी, हडपसर शेवट्या क्षणापर्यंत जुन्नर, आंबेगाब आणि शिरुर तालुक्याचे लिड तोडू शकले नाही. यामुळेच आढळराव पाटील यांचा पराभव झाला.

अमोल कोल्हेंची प्रतिमा ठरली उजवी
संभाजी मालिकेमुळे घराघरात पोहचण्यास कोल्हे यांना मदत झाली आणि उत्तम अभिनयाचे जोरावर त्यांनी मतदारांचे मनावर अधिराज्य गाजवले. आढळराव यांनी प्रचारा दरम्यान कोल्हे यांची काढलेल्या माळी जातीचा परिणाम ही निवडणुकीतील मतांवर दिसून आला. आढळराव यांचे टिकाटिप्पणी करताना कोल्हे यांनी मतदारसंघाचे विकासाचा मुद्दा प्रखरतेने मांडला. आढळराव यांचे कट्टर विरोधक विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी चांगल्या प्रकारे प्रचाराची धुरा सांभाळली. शिवाजीराव आढळराव पाटील हे खरे तर पूर्वी दिलीप वळसे पाटील यांचे सहकारी होते. पण १५ वर्षापूर्वी त्यांना राष्ट्रवादीने तिकीट न दिल्याने ते शिवसेनेत गेले आणि लागोपाठ तीन वेळा खासदार झाले. प्रत्येक वेळी दिलीप वळसे पाटील यांनी त्यांचा पराभव करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. पण त्यांना यश आले नव्हते. यंदा मात्र अमोल कोल्हे यांच्या रुपाने त्यांना यश मिळाले आहे.

दरम्यान, शिरुर लोकसभा मतदार संघामध्ये डॉ. अमोल कोल्हे यांना जुन्नर तालुक्यामधून तब्बल ४१ हजार ५५१ मतांचे विजयी मताधिक्य मिळून दिले. यामुळे तब्बल २३ वर्षांनंतर जुन्नर तालुक्याला डॉ.अमोल कोल्हे यांच्या रुपाने खासदार मिळाले आहे. सन १९९५ मध्ये जुन्नरचे निवृत्तीशेठ शेरकर खासदार म्हणून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. यामुळेच जुन्नरचे निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

शिवाजीराव आढळराव पाटील यांना खेड तालुक्यातील विमानतळ पुरंदर तालुक्यात गेल्याने खेड-आंबेगाव-जुन्नर-शिरूर या चारही मतदार संघातील मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फटका बसला. पुणे-नाशिक रेल्वेचा मार्गाचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना अपयश आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व गट-तट प्रथमच एकत्र आले. कोरी पाटी असलेला उमेदवार असल्याचा कोल्हे यांना फायदा झाला. सलग तीन वेळा मिळालेल्या विजयानंतरही शिरूर लोकसभा मतदार संघातील विकासकामे मार्गी लावण्यास अपयश आल्याच्या विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यात अपयश आले.

मतदार संघातील सामाजिक समीकरण भेदण्यात आलेले अपयश, शहरी मतदारांनी अपेक्षित साथ न देणे, स्वत:च्या हक्काच्या आंबेगाव मतदार संघात मोठी आघाडी मिळाली नाही.
अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची सेलिब्रेटी प्रतिमा तसेच संभाजी महाराजांवरील मालिकेमुळे ते घराघरात पोहचले होते. संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे त्यांच्याविषयी तरुण तरुणी तसेच महिलांमध्ये त्यांचे आकर्षण होते. निवडणुकीत शिरूर मतदार संघातील जातीय समीकरणाचा त्यांना फायदा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने नियोजनबध्द पध्दतीने राबविलेली प्रचार यंत्रणा महत्वाची ठरली.

जागा – आढळराव पाटील – अमोल कोल्हे – आघाडी
जुन्नर –  ७१६३१ – ११३१८२ – ४१५५१
खेड आंळदी –  ९२१३७ – ९९५८३ – ७४४६
आंबेगाव – ८२०८४ – १०७७८१ – २५६९७
शिरुर – ९३७३२ – १२००३७ – २६३०५
भोसरी  – १२५३३६ – ८८२५९ – ३७०७७
हडपसर – १११०८२ – १०५७१२ – ५३७०

शिरुर मतदारसंघातील सर्व उमेदवारांना मिळालेली मते व टक्के

डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी) 635830 49.17%
शिवाजीराव आढळराव (शिवसेना) 577347 44.65%
राहुल ओव्हाळ (वं.ब.आघाडी) 38070 2.94%
जमीरखान कागदी बसप 7247 0.56%
मोहन घारे बळीराजा पा. 997 0.08%
नितीन कुचेकर भा.प्र.पा 607 0.05%
शशिकांत देसाई अपक्ष 1881 0.15%
सोमनाथ माळी ब.रि.सो.पा 743 0.06%
संजय बनसोडे भा.ब.क्रा.द 615 0.05%
संजय पडवळ भा.नो.से 630 0.05%
शशिकांत चाबुकस्वार ब.मु.पा 1243 0.1%
शमशेद अन्सारी अपक्ष 828 0.06%
विकास अस्टूळ अपक्ष 786 0.06%
गंगाधर यादव अपक्ष 955 0.07%
बाळासाहेब घाडगे अपक्ष 2749 0.21%
छाया सोळुंखे अपक्ष 4930 0.38%
भाऊसाहेब अडागळे अपक्ष 4397 0.34%
वहिदा शेख अपक्ष 3837 0.3%
विनोद चांदगुडे अपक्ष 902 0.07%
शाहिद शेख अपक्ष 566 0.04%
शिवाजीराव पवार अपक्ष 673 0.05%
शेख रईसा भा.की.पा 556 0.04%
सोनाली थोरात अपक्ष 677 0.05
नोटा — 6051 0.47%