Coronavirus Impact : हंगामानुसार खरेदीची परंपरा मोडित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –उन्हाची तीव्रता जाणवू लागली की, सनग्लास, टोपी, हातरूमाल, मास्क खरेदी करण्याची परंपरा आहे. पुणेकर फार चोखंदळ…. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये मागणी तसा पुरवठा करीत दुकानदार तयारीत असतो आणि त्याप्रमाणे पुणेकर खरेदीसाठी गर्दी करतात, हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. मात्र, यावर्षी कोरोना व्हायरसच्या विषाणूने थैमान घातले आणि देशभर लॉकडाऊन असल्यामुळे हंगामानुसार खरेदीची परंपरा मोडित निघाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मागिल सव्वा महिन्यापासून कोरोना व्हायरसची महामारी रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे दुकाने नाहीत आणि ग्राहकही दिसत नाहीत. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या विक्रेत्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. कोरोनाच्या भीतीने अनेकांनी गाव गाठले आहे. मात्र, एसटी, रेल्वे सेवा बंद असल्यामुळे अनेकजण शहरातच अडकून पडले आहेत. केव्हा एकदा एसटी आणि रेल्वे सुरू होते आणि आम्ही गावी जातो, असे झाल्याची भावना पेरीवाल्यांनी व्यक्त केली.

हडपसर भाजी मंडई शेजारी मंत्री मार्केटसमोर हंगामानुसार कपडे विकणारा पेरीवाला वर्ग मोठा आहे. या ठिकाणी फळविक्रेते, कपडे, सन ग्लास, हात रूमाल, टोपी, स्कार्प, कानटोपी, स्वेटर अशा अनेकविध वस्तूंची विक्री करणारा परराज्यातील तसेच बाहेरगावचा वर्ग मोठा आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागासह पोलिसांचा ससेमिरा चुकवत, तर कधी हप्ते देऊन व्यवसाय करणारी ही मंडळी कोरोनाच्या संसर्गामुळे पुरती भयभीत झाली आहे.

पुणे शहरासह उपनगर आणि लगतच्या गावांमधील तरुणाईमध्ये देखील आता हंगामानुसार खरेदीचे फॅड आले आहे. उच्चभ्रू वर्ग मॉलमध्ये, तर काही छोटेखानी दुकानात आणि उर्वरित वर्ग रस्ते का माल सस्ते मे खरेदी करीत असतो. सनग्लास खरेदी करण्यासाठी तरुणाईचा उत्साह काही औरच असतो. विक्रेतेसुद्धा रस्त्यावर चौकाचौकात स्टाईलमध्ये डोळ्यावर गॉगल लावून हातात गॉगलची पेटी किंवा उभ्या पट्टीला विविध प्रकारचे गॉगल घेऊन थांबलेले असतात. दुचाकीचालकांना हातवारे इशारे करीत गॉगल खरेदी करण्यासाठी एक प्रकारे बळीच पाडतात म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मार्च-एप्रिलच्या कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सनग्लास, टोपी, हातरुमाल, मास्क, स्कार्प अशा वस्तूंची दुकाने रस्तोरस्तो तसेच चौकाचौकात असतात. त्याच्या जोडीला रहदारीच्या ठिकाणी रसवंती, ज्यूस विक्री जोरात सुरू असते. मार्च महिन्यापासून उन्हाची काहिली वाढली आहे. मात्र, लॉकडाउनमुळे खरेदीसाठी ग्राहक आणि विक्रीसाठी दुकानेही कुठे दिसेनाशी झाली आहेत. कोरोनाचा फटका या हंगामी व्यवसायाला बसला आहे. आता बाहेर कोरोनाची भीती आणि उन्हाचा चटका वाढत असल्याने ग्राहकही घरात बसणे पसंत करू लागले आहेत.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाच्या झळा सुरू होतात. या कालावधीत शीतपेयांच्या मागणीत वाढ होते. सनग्लास, टोपी, हातरुमाल, मास्क यांबरोबर फळांच्या गाड्या चौकाचौकातून हद्दपार झाल्या आहेत. हंगामानुसार व्यवसाय करणारे व्यावसायिकही गायब झाले आहेत. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी अनेकजण असे साहित्य खरेदी करतात. रसवंती, ज्यूस, विविध फळांचे स्टॉलही लागलेले असतात.

पुण्यातील लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, तुळशीबाग, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, हडपसर गांधी चौक, गाडीतळ, येरवडा, गुंजन टॉकी चौक, कात्रज, औंध, बाणेर, बालेवाडी, खडकी, वडगावशेरी, येरवडा, खराडी, कोथरूड आदी ठिकाणच्या गर्दीच्या ठिकाणी चौकाचौकात तसेच पदपथावर या विक्रेत्यांची दाटीवाटीने दुकाने असतात. ग्राहकसुद्धा गर्दीच्या ठिकाणी खरेदीसाठी जातात. तेथे किमतीमध्ये बार्गेनिंग करण्यात काही मंडळी तरबेज असतात. मात्र, त्याच्याही पुढे तो विक्रेता असतो, याचा खरेदीदाराला विसर पडलेला असतो. कोणीही विक्रेता तोट्यात धंदा करत नाही, हे सत्य मानायला शिकले पाहिजे.