World Cup 2019 : पाकिस्तान घाबरला ; भारताविरुद्ध पराभवाची भीती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था-आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ ची सुरूवात येत्या ३० मे पासून होत आहे. इंग्लंडमधील ११ शहरांत तब्बल ४८ सामने रंगणार आहेत. क्रिकेट प्रेमींसाठी हा क्रिकेटचा कुंभमेळाच आहे. जगातील सर्वोत्तम १० देशांचा समावेश असलेली हि स्पर्धा चार वर्षातून एकदा खेळवण्यात येते. त्यामुळे जगभरातील क्रिकेट रसिक याकडे डोळे लावून बसलेले असतात.इतर सामन्यांबरोबरच सर्वात महत्वाचा सामना म्हणजे भारत आणि पाकिस्तानचा सामना. भारत आणि पाकिस्तानप्रमाणेच संपूर्ण जगाचे या सामन्याकडे लक्ष असते. १६ जून रोजी या दोन देशांमध्ये  हा सामना खेळवला जाणार आहे.

या दोन देशांमधल्या या सामन्याला अक्षरशः युद्धाचे स्वरूप येते. मग ते दोन देशांतील खेळाडूंमध्ये असो किंवा दोन देशांतील पाठीराखे आणि प्रेक्षक. आजपर्यंत खेळवला गेलेला प्रत्येक सामना हा अटितटीचाच झालेला आहे. मात्र या दोन्ही देशांमधील आपापसातील मतभेदांमुळे आयसीसी स्पर्धा वगळता भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकटचे सामना २६/११ च्या हल्ल्यानंतर बंद करण्यात आले. आतापर्यंत या दोन देशांत ६ विश्वकपात  झालेल्या सहाही सामन्यांत भारताने विजय मिळवलेला आहे.

दरम्यान, या सामन्याचे दडपण किती असते हे एका पत्रकार परिषदेत पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद याला एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावरून दिसून आले. या आयसीसी वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदनं भारताविरुद्ध सामना हरलो तर, मी माझा नंबरचं बदलून टाकेन, असे उत्तर दिले. त्यामुळं सामन्याआधीच पाकिस्तानला पराभवाची भीती सतावत आहे हे यावरून सिद्ध होते.  परंतू प्रत्यक्ष सामन्याच्या दिवशी जो संघ उत्तम खेळणार, तोच जिंकणार हे मात्र नक्की.