#Yoga Day 2019 : पाचव्‍या योग दिनाचे क्रीडा संकूल आयोजन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – संयुक्त राष्‍ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्‍ट्रीय योग दिन म्‍हणून घोषित केलेला असून या दिवशी सकाळी 7 वाजता सर्व शासकीय,निमशासकीय , स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांतर्गत येणारे कार्यालयातील कर्मचारी, शालेय विद्यार्थी व नागरिकांनी मोठया संख्‍येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

अहमदनगर जिल्‍हा प्रशासन, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्‍हा परिषदेचे शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्‍यमिक) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आंतरराष्‍ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्‍यात आले आहे. पाच हजार वर्षाहून अधिक परंपरा असलेली योग विद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. व्‍यक्‍तीच्‍या शारिरीक व आत्मिक विकासाकरिता येाग विद्या सहाय्यभूत आहे.

योगाचा प्रसार व जनजागृती करण्‍याकरिता दिनांक 21 जून हा दिवस जागतिक योग दिन जिल्‍हा क्रीडा संकूल, वाडिया पार्क, अहमदनगर येथे आयेाजित करण्‍यात आला आहे. या कार्यक्रमाचे औचित्‍य साधून जागतिक विक्रम करण्‍याचा प्रशासनाचा मानस आहे. योग दिनी सहभागी होणा-या शाळांच्‍या बससाठी भाऊसाहेब फिरोदिया हायस्‍कूल मैदानामध्‍ये व इतर संस्‍था, नागरिकांच्‍या वाहनाची पार्कीग व्‍यवस्‍था रिमांड होम समोरील मैदान व जिल्‍हा क्रीडा संकुलाचा बाहेरच्‍या ठिकाणी करण्‍यात आलेली आहे.

जिल्‍हा क्रीडा संकूलास सात गेट असून गांधी पुतळयाच्‍या समोरच्‍या गेट क्रमांक 4 व 5 यामधून विद्यार्थ्‍यांना व इतर गेटमधून नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. शालेय विद्यार्थ्‍यांनी शालेय गणवेशामध्‍ये व नागरिकांनी पांढ-या पोषाखामध्‍ये स्‍वतःचे आसनासह सकाळी 6 वाजता जिल्‍हा क्रीडा संकूल येथे उपस्थित रहावे.