‘ह्या’ बातम्या चुकीच्या आहेत, रस्त्यावर उतरायचे तेंव्हा उतरू : खा. संजय राऊत

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन –  ईडीविरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरणाची तयारी सुरु आहे. यासंदर्भात काही माध्यमांत बातम्याही आल्या आहेत. तसेच, या मोर्चावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यानंतर, काही वेळातच खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन मोर्चासंदर्भातील या बातम्या खोट्या आहेत, असे सांगितले आहे. रस्त्यावर ऊतरायचे तेव्हा ऊतरू. पण हया कारणासाठी नाही. बेकायदेशीर व राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ. कर नाही त्याला डर कशाला? शिवसेनेची शक्ती पाठिशी आहेच. तूर्त प्रदर्शनाची गरज नाही.शिवसैनिक व शिवसेना प्रेमींची अस्वस्थता मी समजू शकतो, असे ट्विट खा. राऊत यांनी केले आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यामुळे ईडीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांत आल्या आहेत. तसेच यावरून आमदार नितेश राणेंनी ट्विट केले आहे. शिवसेना ED ऑफिसच्या बाहेर मोर्चा काढणार म्हणे… हा मोर्चा मराठा आरक्षण साठी निघाला नाही… हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही… हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी म्हणून निघाला नाही… पण वैयक्तिक घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा! महाराष्ट्र धर्म?,” असे ट्विट करत नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. त्यानंतर, काही वेळातच खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन शिवसैनिकांना आवाहन केले आहे. तसेच, मोर्चासंदर्भातील बातम्या खोट्या आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची 5 जानेवारीला ईडीकडून चौकशी होणार आहे. तेव्हा शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 5 जानेवारीला मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर परिसरातून बसेस आणि खासगी गाड्यांनी शिवसैनिक मुंबईत येणार असल्याची माहिती मिळत आहे.