‘वोक्सवैगन’ला हरित लवादाकडून ५०० कोटींचा दणका 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) वोक्सवैगन या वाहननिर्मिती करणाऱ्या जर्मन कंपनीला ५०० कोटींचा दंड ठोठावला आहे. दंडाची ही रक्कम येत्या दोन महिन्यात भरण्याची ताकीद एनजीटीने वोक्सवैगनला दिली आहे. भारतात डिझेल गाड्यांमधील कार्बन उत्सर्जन घटवण्यासाठी वास्तविक आकड्यात फेरबदल करता येतील असे उपकरण वापरल्याचा कंपनीवर आरोप आहे.

वोक्सवैगन कंपनीवर डिझेल कारमध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्याऐवजी प्रदूषण तपासणीच्या आकड्यांमध्ये फेरफार होईल, अशा चीपचा वापर केल्याचा आरोप आहे . कंपनीने १ . ११ कोटी कारमध्ये हे उपकरण लावल्याचे मान्य केले आहे.

वोक्सवैगनच्या कारमुळे पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचे भारतात एनजीटीसमोर आल्यानंतर याची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीनंतर कंपनीने बाजारातील ३.२३ लाख वाहने परत मागवून त्यात नवीन उपकरण लावणार असल्याचे सांगितले होते. मात्र, कंपनीने या कारमध्ये असे उपकरण बसवले की, जे सॉफ्टवेअरच्या मदतीने कार्बन उत्सर्जनच्या आकड्यांमध्ये फेरफार केले जाऊ शकत होते . या उपकरणाच्या मदतीने कारमधून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाच्या आकड्यात फेरफार करता येऊ शकते हे प्रयोगशाळेत स्पष्ट झाले.



वोक्सवैगनला १०० कोटींचा दंड –

यापूर्वीही एनजीटीने वोक्सवैगनला १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. एनजीटीचे अध्यक्ष न्या.आदर्शकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने वोक्सवैगनच्या गाड्यांपासून होणाऱ्या पर्यावरणाच्या नुकसानीचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती. एनजीटीच्या चार सदस्यीय समितीने जर्मन कार निर्माती कंपनी वोक्सवैगनला चुकीचे सॉफ्टवेअरचा वापर करून दिल्लीतील हवा प्रदूष वाढविल्याप्रकरणी १७१.३४ कोटी रुपये दंड करण्याची शिफारस केली होती.