निगडी पोलिसांकडून १६ किलो गांजा, ३६ मोबाईल, ९ दुचाकी आणि एक डंपर जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – निगडी पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक केलेल्या गुन्हेगारांकडून ३६ मोबाईल, ९ दुचाकी, १ डंपर आणि १६ किलो गांजा असा एकूण १५ लाख ९५ हजार ४६० रुपयांचा ऐवज जप्त केला.

ओटास्कीम येथे एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार किशोर पढेर आणि विलास केकाण यांना मिळाली त्यानुसार परिसरात सापळा रचून मंटू चंद्रभूषण पासवान (४६, रा. आझाद चौक, निगडी) याला अटक केली. त्याच्याकडून १६ किलो ३०० ग्रॅम वजनाचा ३ लाख ४५ हजार ४५० रुपये किमतीचा गांजा जप्त केला.

नारायण गुणाजी तांबवे (५५, रा. निगडी) यांचा ६ लाख रुपये किमतीचा डंपर चोरी झाला होता. त्यांच्या डंपरला असलेल्या जीपीएस डिव्हाईसद्वारे तांत्रिक तपास करून पोलीस हवालदार किशोर पढेर आणि विलास केकाण यांनी सांगली मधील नरसोबाचीवाडी येथे जाऊन विजय मारुती शिंदे (३५, रा. पोखरी, आष्टी, जि. बीड), सोमनाथ लक्ष्मण पंदीखोडे (२८, रा. आरबुजवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी) यांना अटक केली.

गस्त घालत असताना पोलीस शिपाई अमोल साळुंखे, भूपेंद्र चौधरी यांना एका मोटारसायकल वरून तीनजण जाताना दिसले. त्यांनी दुचाकीस्वारांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना पाहून तिघेजण पळून जाऊ लागले. पोलिसांनी शिताफीने तिघांना ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ दोन चाकू आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता तिघांनी पिंपरी, चिंचवड, निगडी, चिखली, भोसरी या परिसरात मोबाईल आणि वाहन चोरी केली असल्याचे समोर आले. तिघांकडून २८ मोबाईल, दोन दुचाकी आणि चाकू असा एकूण ४ लाख ४८ हजार दहा रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून अभिषेक लक्ष्‍मण भोसले (१९) आणि विशाल ऊर्फ जंगल्या हिरालाल लष्करे (२०, दोघे रा. काळेवाडी) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस नाईक रमेश मावसकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी चोरणारी तीन अल्पवयीन मुले भक्ती शक्ती चौकात येणार आहेत. निगडी पोलिसांनी भक्ती शक्ती परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १ लाख ३४ हजार रुपये किमतीच्या ६ मोटारसायकल जप्त केल्या.

मोहम्मद खलील गुलामहसन (२१, रा. निगडी, मूळ रा. जम्मू काश्मीर) याच्या घरातून त्याचे व मित्रांचे मिळून सहा मोबाईल फोन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याचा तपास करत असताना पोलीस नाईक सतीश ढोले यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यात चोरी झालेला मोबाईल फोन अजय अनिल साबळे (२०, रा. अजंठानगर, चिंचवड) हा वापरत आहे. पोलिसांनी सापळा रचून अजय याला रोजी अटक केली. त्याने त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांसोबत मिळून हा गुन्हा केल्याचे सांगितले. दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन तिघांकडून ६८ हजार रुपये किमतीचे ८ मोबाईल फोन जप्त केले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, पोलीस कर्मचारी किशोर पढेर, सतीश ढोले, विलास केकाण, रमेश मावसकर, विनोद व्होनमाने, विजय बोडके, राहुल मिसाळ, तुषार गेंगजे, प्रवीण मुळूक, सोमनाथ दिवटे, मितेश यादव, अमोल साळुंके, भुपेंद्र चौधरी यांच्या पथकाने केली.

तडीपार दोन आरोपींना अटक

दीपक शहाजी रिठे (२२, रा. ओटास्कीम, निगडी), सोमनाथ हनुमंत लष्करे (२२, रा. ओटास्कीम, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दीपक याला फेब्रुवारी २०१९ मध्ये तर सोमनाथ याला जानेवारी २०१९ मध्ये दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. ते तडीपारीच्या कालावधीत जिल्ह्याच्या हद्दीत मिळून आल्याने त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त