अकोला महापालिकेच्या आयुक्तपदी IAS निमा अरोरा यांची नियुक्ती

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – अकोला महापालिकेच्या आयुक्तपदी आयएएस निमा अरोरा यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य शासनाने आज (बुधवार) जारी केले. निमा अरोरा यापूर्वी जालना जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. अत्यंत शिस्तप्रिय व पारदर्शी कामासाठी त्या ओळखल्या जातात.

महापालिकेतील मागील तीन वर्षाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता केल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. कोट्यावधी रुपयांचे घोटाळे चव्हाट्यावर आल्यानंतर देखील प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. याच दरम्यान पालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या बदलीची चर्चा होऊ लागली. त्यांच्या जागेवर राठोड, सदाशिव तसेच सुनिल विंचनकर यांच्या नावाची चर्चा रंगू लागली. मात्र, शासनाने आयएएस दर्जाच्या अधिकारी निमा अरोरा यांची नियुक्ती केली. बुधवारी शासनाने त्यांच्या नियक्तीवर शिक्कामोर्तब केले.

आयुक्तपदी नियुक्ती केलेल्या निमा अरोरा शुक्रवारी (दि.5) पदभार स्विकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्या पदभार स्विकारणार नसल्याच्या अफवा राजकीय वर्तुळात पसरवल्या जात आहेत.

पहिल्यांदाच महिला आयुक्ताची नियुक्ती
अकोला महानगरपालिकेची स्थापना 2001 मध्ये झाली. या वीस वर्षाच्या काळात पहिल्यांदाच मनपात महिला आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती होत आहे. त्या कशा पद्धतीने काम करता याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच मनपातील भ्रष्ट आणि कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.