Valentine Day साठी नितेश राणेंचं CM ठाकरेंना गिफ्ट; म्हणाले – ‘शिवसेना आमचं जुनं प्रेम’ (व्हिडीओ)

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – देशाचे गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे सिंधुदुर्ग दौरा आटोपून दिल्लीत परतत नाहीत तोच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघातच भाजपला खिंडार पाण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे. वैभववाडी नगरपंचायतीतील भाजपच्या सात नगरसेवकांनी एकाच वेळी राजीनामा दिला असून ते सातही जण आपल्या हातावर शिवबंधन बांधणार आहेत. त्यामुळे आमदार नितेश राणेंनीही ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला चिमटा काढला आहे.

नितेश राणे यांनी व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत राणे म्हणतात, वैभववाडीचे काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची बातमी वाचली, व्हेंलेनटाईन डे काही दिवसावर आहे आणि शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे, जुन्या प्रेमाला कधी विसरायचं नसतं असं सगळेच म्हणतात. वैभववाडीची सध्या परिस्थिती पाहिली तर शिवसेनेकडे मूळ शिवसैनिक सापडणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत कोणी उमेदवार भेटणार नाहीत, शिवसेना पक्ष हा हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरेंवर आमचं नितांत प्रेम आहे, त्यामुळे शिवसेना पक्षाची अशी अवस्था होऊ नये अशी माझ्यासारख्या बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या कुटुंबाची भावना आहे. म्हणून हे सात नगरसेवक व्हेंलेनटाईन डे निमित्त उद्धव ठाकरेंकडे पाठवतोय असा टोला नितेश राणेंनी लगावला.

उद्धव ठाकरेंकडून सकारात्मक प्रतिसाद
नितेश राणे पुढे म्हणतात, मेडिकल कॉलेजसाठी नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन लावला होता. तेव्हा उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद देत मेडिकल कॉलेजच्या फाईलवर सही केली. आम्ही उद्धव ठाकरेंना काही देऊ शकत नाही, दिलं तरी ते घेणार नाहीत, गुच्छ दिला तरी ते स्विकारणार नाहीत. त्यामुळे हे सात नगरसेवक त्यांना आभार आणि धन्यवाद मानण्यासाठी पाठवत आहे, त्याचा स्वीकार त्यांनी करावा असं सांगत नितेश राणेंनी व्हेंलेनटाईन डे निमित्त उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देत शिवसेनेला चिमटा काढला.