‘कर्जमाफी’वरून नितेश राणेंची सरकारवर ‘टीका’, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली होती. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी सरकारचे प्रयत्न असून, पहिली यादी सोमवारी (दि.24) जाहीर करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर काही तासात शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली. सरकारच्या शेतकरी कर्जमाफीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करून सरकारवर निशाणा साधताना म्हटले आहे की, कर्जाच्या यादीत कोकणातल्या एकाही शेतकऱ्याला कर्जमाफी करण्यात आलेली नाही. कारण कोकणातील शेतकरी आपले कर्ज 100 टक्के भरतात. त्यामुळे एनपीए होत नाही. मग कर्ज भरणाऱ्यांना आणि न भरणाऱ्यांना एकच न्याय असा सवाल त्यांनी उपस्थित करून कोकणातील शेतकऱ्यांनी यापुढे कर्ज भरु नये असे म्हटले आहे.

कर्जमाफी झालेल्या पहिल्या यादीत राज्यातील 68 गावातील शेतकऱ्यांची नावे आहेत. तब्बल 9 हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, कृषीमंत्री दादा भुसे उपस्थित होते. राज्य सरकारनं कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्यापूर्वी 34 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती संग्रहित केली होती. कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना तसं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे.