भाजप आमदाराचा ठाकरे सरकारला खोचक सवाल; म्हणाले – ‘हा कोरोनाचा ‘वाझे स्ट्रेन’ तर नाही ना?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना (COVID-19) चा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यमंत्र्यांनी अनेकदा लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. परंतु महाविकासमधील राष्ट्रवादी पक्षासह विरोधक आणि जनतेचाही याला विरोध आहे. पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येईल अशी शक्यता निर्माण झाली असून तशा चर्चाही रगंल्या आहेत. अशात राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरून आणि सचिन वाझे प्रकरण (Sachin Vaze Case) वरून आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर खोचक टीका केली आहे.

‘हा नव्यानं सापडलेला वाझे स्ट्रेन तर नाही ना ?’

नितेश राणे यांनी ट्विट करत यासंदर्भात भाष्य केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, 5 मार्च रोजी मनसुख हिरेनची हत्या झाली. त्यावेळी महाराष्ट्रातील नवी रुग्णसंख्या 8,998 होती. 1 एप्रिल रोजी ही संख्या 39 हजार 544 इतकी दिसून आली. 5 मार्चनंतर रुग्णवाढीचा वेग अचानक वाढला की, काय ? हे आकडे खरंच योग्य पद्धतीनं दिले आहेत ना ? की (कोरोनाच्या इतर स्ट्रेनप्रमाणे) हा नव्यानं सापडलेला वाझे स्ट्रेन तर नाही ना असा खोचक सवालही राणे यांनी केला आहे.

‘सचिन वाझेंचं प्रकरण समोर आलं की, लगेच दणादण कोरोनाचे आकडे वाढायला लागलेत’

याआधीही राणे यांनी वाढत्या कोरोनावरून राज्य सरकारवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, जेव्हा जेव्हा सरकार अडचणीच आलं आहे, तेव्हा तेव्हा कोरोनाचे आकडे वाढले आहेत. सचिन वाझेंचं प्रकरण समोर आलं की, लगेच दणादण कोरोनाचे आकडे वाढायला लागले आहेत. हे आकडे फक्त महाराष्ट्रात वाढत आहेत देशात नाही. या बातम्या घडवल्या जात आहेत आणि लॉकडाऊनच्या धमक्या दिल्या जात आहे याची चौकशी केली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली होती.