JDU चे 17 आमदार RJD च्या संपर्कात, बिहारमधील नितीश कुमार यांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची संकटात ?

पाटणा : पोलीसनामा ऑनलाइन – बिहारमध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने अटीतटीची लढाई लढत सत्ता आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले आहे. पंरतु, या निवडणुकीत भाजपा मोठा तर जेडीयू (JDU) लहान पक्ष ठरल्याने या सरकारला केव्हाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच आता राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते श्याम रजक यांनी नितीश कुमार (Nitish Kumar) सरकारच्या भविष्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

जेडीयूचे १७ आमदार आरजेडीच्या संपर्कात असून, ते लवकरच लालूप्रसाद यादव यांच्या पक्षात दाखल होतील, असा दावा श्याम रजक यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, हे सर्व आमदार भाजपाच्या कामकाजावर नाराज आहेत. यामुळे जेडीयूचा राजीनामा देऊन आरजेडीत प्रवेश करण्यासाठी हे आमदार इच्छुक आहेत. पक्षांतर कायद्यांतर्गत कारवाई होऊन सदस्यत्व रद्द होऊ नये म्हणून या आमदारांना थांबवण्यात आले आहे. परंतु, या कायद्यानुसार जेडीयूचे २५ ते २६ आमदार पक्ष सोडून आरजेडीत आल्यास त्यांच्या सदस्यत्वाला धोका निर्माण होणार नाही.

सध्या माझ्या माध्यमातून हे १७ आमदार आरजेडीच्या संपर्कात आहेत. भाजपाने अरुणाचल प्रदेशात जेडीयूच्या सहा आमदारांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे भाजपा नितीश कुमार यांच्यावर वर्चस्व दाखवू लागल्याचे दिसत आहे. या घटनेमुळेच बिहारमधील हे १७ आमदार नाराज असल्याचा दावा रजक यांनी केला.

दरम्यान, जेईडीयूचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी श्याम रजक यांचा यांचा दावा व वक्तव भ्रामक आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. जेडीयू पूर्णपणे एकसोबत असून, भाजपासोबत सरकार पाच वर्ष पूर्ण करेल, असा दावाही त्यांनी केला. तसेच जेडीयूचे आमदार आरजेडीच्या संपर्कात नाहीत तर आरजेडीचे आमदार तेजस्वी यादव यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची टीका राजीव रंजन यांनी केली.