Bihar Elections 2020 : नितीश कुमारच्या JDU ने मान्य केला पराभव

बिहार : वृत्तसंस्था – जनतेने जो कौल दिला आहे, आम्ही त्याचे स्वागत करतो. राष्ट्रीय जनता दल किंवा तेजस्वी यादव यांनी आमचा पराभव केलेला नाही, पण काेरोना व्हायरसमुळे आम्ही पराभूत झालो असल्याचे जनता दल युनायटेडचे प्रवक्ते के. सी. त्यागी (Janata Dal-United spokesperson KC Tyagi) एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले. फक्त करोनामुळे आम्ही मागे पडलो आहोत. मागच्या 70 वर्षांत बिहारची जी अधोगती झाली, त्याची किंमत आम्ही चुकवतोय असेही त्यागी म्हणाले.

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने पराभव मान्य केला आहे. मतमोजणी सुरू होताच तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने अनेक मतदारसंघात मोठी आघाडी घेतली होती. पण आता भाजप प्रणीत एनडीए आणि महाविकास आघाडीमधील अंतर बरेच कमी झाले असून, दोघामध्ये अटीतटीची लढत सुरू आहे.

भाजप आणि जेडीयू एकत्र निवडणूक लढवत असले तरी त्यांच्यातही एक स्पर्धा होती. सध्याचे जे कल आहेत, त्यानुसार भाजप जेडीयूपेक्षा बराच पुढे आहे. जेडीयूच्या खराब प्रदर्शनाचा एनडीएला फटका बसला आहे. नितीश कुमार यांनी सलग चौथ्यांदा सत्तेसाठी बिहारच्या जनतेकडे कौल मागितला होता. नितीश कुमार यांना नोकऱ्या, काेरोना व्हायरसची हाताळणी, स्थलांतरित मजुरांचे प्रश्न या मुद्यांवरून जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला.