कोरोना संकटकाळात कामासाठी फडणवीस अन् माझ्याइतकं राज्यात कोणताही नेता फिरला नसेल – चंद्रकांत पाटील

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या या संकटकाळात राज्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माझ्याइतके काम राज्यातील इतर कोणत्याच नेत्याने केले नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. आम्ही कोरोनाच्या कालावधीमध्ये राज्यात सतत फिरत आहोत. आमच्या दोघांइतके राज्यातील कोणताही नेता फिरला नसेल असेही पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोनाच्या कालावधीमध्ये कार्यकर्त्यांना दिलेला इशारा हा प्रेमळ सल्ला आहे. नीतीनजी आम्हा सर्वांचे पालक आहेत. आई जशी मुलाला म्हणते ना संभाळून जा, गाडीतून हात बाहेर काढू नकोस, अशा भूमिकेमधून ते सांगतात असे पाटील म्हणाले. तसेच आम्ही कोरोनासंदर्भातील सगळं काम संभाळून करत असल्याचे पाटील म्हणाले. दरम्यान भाजपा नेत्यांची मराठा आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांना रसद पुरवली जात असून नागपूर कनेक्शनसंदर्भात काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांना पाटील यांनी उत्तर दिल आहे. सचिन सावंत यांनी आरोप करू नयेत पुरावे द्यावेत, असे पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाजातर्फे होणाऱ्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असून पक्षाचे नेते व कार्यकर्ते त्यात सहभागी होतील, अशी घोषणा पाटील यांनी केली. मराठा आरक्षणासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.