पुणेकरांसाठी संपूर्ण Lockdown की कडक निर्बंध? आज होणार निर्णय, आढावा बैठकीकडे सर्वांचे लक्ष

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाउनऐवजी कडक निर्बंध लावण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे सादर केला आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 2) होणाऱ्या कोरोनाच्या आढावा बैठकीत कोणत्या प्रकारचे निर्बंध लावायचे याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आज होणा-या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बैठकीला शहर आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांना निमंत्रित केले आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा दर शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आढावा घेतात. कोरोनाबाधितांची संख्या कमी न झाल्यास 2 एप्रिल रोजी लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा गेल्या शुक्रवारच्या बैठकीत पवारांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा आढावा बैठक होत आहे. याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले की, कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाउन हा एकमेव पर्याय नाही. त्यामुळे लॉकडाउनचा पर्याय प्रस्तावित केला नाही. त्यापेक्षा आणखी कडक निर्बंध लावण्याबाबत सुचवले आहे. यावर आजच्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यासाठी या बैठकीला आमदारांना निमंत्रित केल्याचे राव यांनी स्पष्ट केले.