पुण्यात शनिवार अन् रविवारच्या संपुर्ण Lockdown ला सध्यातरी ‘अर्धविराम’ : सौरभ राव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत जात आहे. दरम्यान, रूग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. नवीन रूग्ण समोर येत असल्यानं पुणेकरांची चिंता वाढत आहे. दरम्यान, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काही दिवसांपुर्वी जिल्हा प्रशासन पुण्यात शनिवार आणि रविवार संपुर्णपणे लॉकडाऊन करण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं होतं. त्यापार्श्वभुमीवर आज झालेल्या पत्रकार परिषदेत सौरभ राव यांनी सध्या तरी या विषयाला अर्धविराम देण्यात आल्याचं सांगुन पुण्यात शनिवार आणि रविवारी संपुर्ण लॉकडाऊन राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनानं दि. 23 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. तो संपण्यापुर्वी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुण्यात शनिवार आणि रविवारी संपुर्णपणे लॉकडाऊन करण्याचा विचार शासन पातळीवर चालु असल्याचं सांगितलं होतं. मात्र, सध्या व्यापारी संघटनेच्या मागण्या वेगळ्या आहेत. त्याबाबत राज्य शासनातील उच्च स्तरावर निर्णय घेण्यात येतो. त्यामुळे सध्यातरी पुण्यात शनिवारी आणि रविवारी संपुर्ण लॉकडाऊन या विषयास अर्धविराम मिळाल्याचं आज झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान विशेष कार्यकारी अधिकारी (विभागीय आयुक्त कार्यालय) सौरभ राव यांनी सांगितलं आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारी पुण्यात संपुर्णपणे लॉकडाऊन राहणार नाही. दरम्यान, 1 ऑगस्ट पासून अनलॉक 3 चालू होणार आहे. त्याबाबतची नियमावली राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुण्यात देखील ती लागू राहील. दरम्यान, त्याबाबत काही निर्बंध घालायचे असतील तर त्याबाबत कळविण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.