COVID-19 च्या नावावर भारतीयांना फसवण्याच्या तयारीत उत्तर कोरियाचा ‘हॅकर’ ग्रुप, ‘हा’ आहे प्लान

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस संसर्गाशी लढत असलेल्या भारत, अमेरिकेसह सहा मोठ्या देशांवर आणखी एका संकटाचे सावट आहे. उत्तर कोरियाचा हॅकर ग्रुप लॅजारस या देशांमध्ये लोकांना कोविड 19 शी संबंधीत मदत कार्याच्या नावावर फसवणूक करण्याची योजना बनवत आहेत. याचा खुलासा सिक्युरिटी रिसर्च फर्म सायफर्माने केला आहे.

सीएनबीसी टीव्ही 18 च्या वृत्तानुसार सायफर्माने म्हटले आहे की, हॅकर्स लोकांना फसवण्यासाठी मोठा फिशिंग हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये लोकांना मोठ्याप्रमाणात बनावट ईमेल पाठवले जातील. यांचे स्त्रोत असे दिसतील, जसे की ते अधिकृत आहेत. हॅकर्स या ईमेलद्वारे लोकांना बनावट वेबसाइटवर घेऊन जातील. तेथे त्यांच्याकडे वैयक्तिक आणि आर्थिक माहिती मागितली जाईल.

भारतासह अमेरिका, ब्रिटन, जपान, सिंगापुर आणि दक्षिण कोरियाचे सुमारे 50 लाख युजर्स या हॅकर्स ग्रुपच्या निशाण्यावर येऊ शकतात. सायफर्माने म्हटले, अनेक खंडांमध्ये सहा टार्गेट देशांमध्ये एक समान धागा आहे – या देशांच्या सरकारांनी कोविड 19 महामारीमुळे प्रभावित अर्थव्यवस्थेला स्थिर करण्यासाठी व्यक्ती आणि व्यवसायांना महत्वपूर्ण आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.

भारताने सुद्धा कोरोना महामारीच्या प्रभावामुळे 20 लाख करोड रूपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. सायफर्माने म्हटले, लॅजारस ग्रुपकडून आपल्या फिशिंग हल्ल्यात सरकारी एजन्सी, विभाग आणि ट्रेड असोसिएशनला सुद्धा फसवले जाऊ शकते.

हॅकर्सने भारतातील 20 लाख खासगी ईमेल आयडी असल्याचा दावा केला. हॅकर्स दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि अहमदाबादच्या लोकांना निशुल्क कोविड-19 तपासणीसाठी ईमेल पाठवू शकतात. यासाठी ते लोकांची खासगी आणि आर्थिक माहिती ईमेलद्वारे मागू शकतात.