संपुर्ण देशात नव्हे तर 20 राज्यांत लॉकडाऊन, काही ठिकाणीची परिस्थिती निवडणुकीनंतर बिघडली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. दररोज तीन लाखाहून अधिक आढळणारी बाधितांची संख्या चार लाखापेक्षा अधिक होत आहे. अनेक राज्यांमध्ये बिकट अवस्था निर्माण झाली असून आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर गेली आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. देशातील २० राज्यांत लॉकडाऊन, संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये आता तामिळनाडूचाही समावेश झाला आहे. १० मेपासून दोन आठवड्यांच्या कठोर लॉकडाऊनची घोषणा नवे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केली आहे.

केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरयाणा, मध्य प्रदेश, ओदिशा, झारखंड, छत्तीसगढ, मिझोराम, नागालँड, पुद्दुचेरी, जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे, तर महाराष्ट्र, गुजरात, आसाम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मेघालय आणि पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊनप्रमाणेच रात्रीची संचारबंदी, तसेच कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. एकूणच देशातील २६ राज्यामध्ये लॉकडाऊन सुरु आहे त्यामुळे पुन्हा केंद्र सरकार संपूर्ण देशात तो लावणार नाही. देशातील बहुतांश भागात लॉकडाऊनसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याचे चित्र आहे.
ज्या राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे तेथे निवडणुका झाल्यानंतर परिस्थिती बिघडल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडू तसेच उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि गोव्याचा समावेश आहे. या राज्यांमध्ये निवडणुकांनंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.

उत्तर भारतात लॉकडाऊन
उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर येथे बाधितांची संख्या वाढली. तर कुंभमेळ्यानंतर उत्तराखंडमध्ये परिस्थिती बिघडली. एकूणच उत्तर भारतामध्ये जम्मू आणि काश्मीर, तसेच उत्तराखंड वगळता सर्वच राज्यांमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

दक्षिणेतील चार राज्यांमध्ये लॉकडाऊन
देशातील महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक दैनंदिन रुग्णांची नोंद होत आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्ली या राज्यांचा क्रमांक आहे. शनिवारी ४१ हजारांहून अधिक नवे रुग्ण केरळमध्येही आढळले. तर कर्नाटकचा आकडाही ५० हजारांवर पोहोचला. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश वगळता दक्षिणेकडील तीनही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात लॉकडाऊन आहे.

देशात प्रथमच एका दिवसात ४ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू
देशात शनिवारी ३ लाख १८ हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनमुक्त झाले. तर ४ लाख १ हजार नवे रुग्ण आढळून आले. महत्त्वाचे म्हणजे शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी नव्या रुग्णांची संख्या १४ हजारापेक्षा कमी होती. दरम्यान, कोरोना संसर्गामुळे शनिवारी ४ हजार १८७ जणांचा मृत्यू झाला. देशात एका दिवसात प्रथमच मृतांचा आकडा वाढला आहे. आतपर्यंत देशात २ लाख ३८ हजार २७०जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३७ लाख २३ हजार ४४६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १६ कोटी ७३ लाख ३० हजार ९६० जणांना लस देण्यात आली आहे. असून कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ८१.९० टक्के आहे.