भांडुप : क्लीन-अप मार्शलच्या डोक्यात घातला पेवर ब्लॉक; 3 महिलांना अटक

भांडुप : वृत्तसंस्था – भांडूप रेल्वे स्थानकाजवळ एका महिला क्लीन-अप मार्शलला मारहाण करत तिच्या डोक्यात पेवर ब्लॉक टाकून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी तीन महिलांना अटक केली आहे. जखमी कर्मचा-याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी रोहिणी दोंदे (28), शोभा दोंदे आणि सीमा भेंडारे असे अटक केलेल्या तीन महिलांची नावे आहेत. दर्शना चौहान (वय 27) असे मारहाण झालेल्या क्लीन-अप मार्शलचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शना चौहान या भांडुप रेल्वे स्थानकाजवळ मोतीबाईवाडी येथे त्यांच्या सहकार्‍यांसोबत मास्क न घातलेल्या नागरिकांवर कार्यवाही करत होत्या. त्यावेळी एक महिला या ठिकाणी मास्क न घालता उभी होती. दर्शना यांनी या महिलेला मास्क न घातल्याने विचारणा केली आणि त्यानंतर या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.

त्यानंतर हाणामारीवरच प्रकरण न थांबता या महिला प्रवाशासोबत असलेल्या इतर दोन महिलांनीदेखील दर्शना यांना मारहाण करत तिच्या डोक्यात पेवर ब्लॉक उचलून टाकला. या घटनेत दर्शना यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. यासंदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत.

You might also like